भाव लाख पार झाले तरी अस्सल ‘सोने’ लूट!; विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदीचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:11 IST2025-10-03T12:11:33+5:302025-10-03T12:11:58+5:30
२ ऑक्टोबर रोजी सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन एक लाख १८ रुपयांवर आले तर चांदी भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ४७ हजार रुपयांवर पोहचली.

भाव लाख पार झाले तरी अस्सल ‘सोने’ लूट!; विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदीचा उत्साह
विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदा सोन्याचे भाव एक लाखाच्या पुढे गेले तरी सोने खरेदीचा उत्साह कायम असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्रतिसाद वाढून जवळपास २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन एक लाख १८ रुपयांवर आले तर चांदी भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ४७ हजार रुपयांवर पोहचली.
नवरात्रोत्सवापासून सोने-चांदी खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोने चांदीचे भाव एक लाखाच्या पुढे गेले असले तरी ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विजयादशमीला उलाढालीत भर पडली.
स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन.
विजयादशमीला चार वर्षात ७० हजारांनी वधारले सोने
चार वर्षातील विजयादशमीच्या दिवसाची सोने-चांदीचे भाव पाहिले तर या चार वर्षीत सोने ७० हजार ५० रुपयांनी वधारले. चांदीही ८५ हजार ३०० रुपयांनी वधारली आहे.
वर्ष सोने चांदी
२०२१ ४७,९५० ६२,२००
२०२२ ५२,६०० ६२,०००
२०२३ ६१,३०० ७३,५००
२०२४ ७६,६०० ९३,०००
२०२५ १,१८,००० १,४७,५००