अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 05:15 IST2025-04-13T05:08:00+5:302025-04-13T05:15:41+5:30
Maharashtra Latest News: रायगडावरील कार्यक्रमात गृहमंत्री शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीच भाषणे होणार होती. मग नंतर काय घडलं?

अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगडमधील दौऱ्यावेळी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना आणि अजित पवार गटातील रुसवेफुगवे दिसून आले. आपल्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Mahayuti News)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुधवारी रायगडावरील कार्यक्रमात गृहमंत्री शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीच भाषणे होणार होती. मात्र, फडणवीस यांना भाषणासाठी संचालनकर्त्याने आमंत्रित केले तेव्हा फडणवीस यांनी आधी शिंदे यांना भाषण करू द्यावे, असे संचालनकर्त्याला सांगितले.
त्यानुसार आधी शिंदे यांनी भाषण केले. कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र भाषणाची संधी मिळाली नाही. फडणवीस यांनी शिंदे यांना भाषण करायला सांगून संतुलन साधले आणि शिंदेसेनेची नाराजी कमी केली, असे म्हटले जात आहे.
सायंकाळी शाह यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी भोजन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार उपस्थित होते.
शाह यांच्याकडे शिंदेंनी व्यक्त केली नाराजी
निधीवाटप तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदावरून अद्यापही न्याय मिळत नसल्याची भावना शिंदे यांनी शुक्रवारी रात्री पुणे येथे अमित शाह यांना भेटून व्यक्त केल्याची माहिती आहे.
पालकमंत्री पद आणि निधी वाटप हे दोन्ही विषय अजित पवार गटाशी संबंधित आहेत. त्यामुळे शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाबाबतच नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जाते.
पालकमंत्रिपदाबाबत चर्चा नाही : तटकरे
सुनील तटकरे यांनी रायगडावरील कार्यक्रमानंतर सांगितले की, शाह यांच्याशी स्नेहभोजनावेळी राजकीय चर्चा झाली नाही. पालकमंत्रिपदाबाबतही बोलणे झाले नाही.
रायगडचे पालकमंत्रिपद हे शिंदेसेनेला हवे आहे. मात्र, ते अदिती तटकरे यांना पूर्वीप्रमाणे द्यावे, असा अजित पवार गटाचा आग्रह आहे. सध्या पालकमंत्री पदाला स्थगिती आहे.
तटकरे यांच्या निवासस्थानाकडे मंत्री भरत गोगावले यांनी पाठ दाखवली. त्याऐवजी ते आपल्या मतदारसंघातील हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात व्यग्र राहिले.