देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:02 IST2025-06-12T13:00:29+5:302025-06-12T13:02:03+5:30

मुख्यमंत्र्‍यांना जर कुणी भेटले असेल तर त्यात वावगं काय असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Even after Devendra Fadnavis-Raj Thackeray meeting, Uddhav Sena leaders are positive about alliance with MNS | देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मुंबई - मागील काही काळापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यातच आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एका हॉटेलमध्ये बैठक पार पडली. जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झाले याचा तपशील समोर आला नाही परंतु राज-फडणवीस भेटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक आहेत. आम्ही हात पुढे केलाय, जो काही निर्णय असेल वरिष्ठ पातळीवर होईल. मुख्यमंत्र्‍यांची भेट कुणीही घेऊ शकते अशी प्रतिक्रिया उद्धवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे.

उद्धवसेनेचे नेते अनिल परब म्हणाले की, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ही भेट कशासाठी झाली, काय चर्चा झाली याचे कुणाकडेही तपशील नाहीत. मुख्यमंत्र्‍यांना कुणीही भेटू शकते. उद्या मीही भेटू शकतो त्यामुळे ही भेट राजकीय आहे असं म्हणण्याचं कारण नाही. उद्या मुख्यमंत्र्‍यांना कुणी भेटले तर त्याचा अर्थ राजकीय काढायला हवा असं नाही. या भेटीत काय झाले, काय चर्चा झाली त्याचा तपशील बाहेर येऊ द्या. ही भेट राजकीय होती का हे कळू द्या मग त्यावर बोलता येईल. कशासाठी भेटले हा महत्त्वाचा विषय आहे. राजकीय भेटले, एखाद्या कामासाठी भेटले ते अजून तपशील कळाला नाही. शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केली आहे. युतीसाठी हात पुढे केलेला आहे. आता हे प्रकरण कसे पुढे जाते, त्यावर वरिष्ठ काय निर्णय घेतात हे वरिष्ठ ठरवतील असं त्यांनी म्हटलं. 

तर भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात. आपण फार मत व्यक्त करणे घाईचे होईल. शिवसैनिकांच्या भावना आम्ही सातत्याने मांडत आलोय. ज्या काही भेटी होतायेत त्याला राजकीय रंग देऊ नका. मुख्यमंत्र्‍यांना जर कुणी भेटले असेल तर त्यात वावगं काय असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

दरम्यान, प्रत्येकाचे राजकीय संबंध असतात. कधी कुणासोबत सूत जुळतील सांगता येत नाही. कुणी लग्नात भेटते, कुणी घरी जाऊन भेटते. राज ठाकरे दिलदार व्यक्तिमत्व आहेत. सगळ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंची जी भेट झाली, निश्चित त्याला राजकीय अर्थ आहे. ते दरवेळी भेटतात त्यात काही सूचना असतात, काही कामे असतात. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय होईल, काय गणिते असतील त्यावर आता बोलणे चुकीचे आहे. त्यांच्या भेटीनंतर जो काही खुलासा असेल तो मुख्यमंत्री किंवा राज ठाकरे स्वत: करतील असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

Web Title: Even after Devendra Fadnavis-Raj Thackeray meeting, Uddhav Sena leaders are positive about alliance with MNS