बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:52 IST2024-12-10T08:48:57+5:302024-12-10T08:52:30+5:30

कोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही.

Even after defection, the leaders are the same MLAs, ministers of the old party; MNS, NCP websites are still old NCP, Shivsena MNS | बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

- महेश पवार 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन स्वतंत्र पक्ष अस्तित्वात आले. ही संधी साधत अनेकांनी पक्षांतर केले. मात्र, पक्षांच्या वेबसाइटवर अजूनही त्या नेत्यांचे फोटो दिमाखाने झळकत आहेत. मनसेच्या दोन सरचिटणीसांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन उद्धवसेनेते प्रवेश केला आहे. मात्र, त्यांचीही नावे मनसेच्या अधिकृत वेबसाइटवर असल्यामुळे ते अजूनही पक्षामध्ये आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षावर टीका करून १० एप्रिल २०२४ रोजी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी सरचिटणीस परशुराम उपरकर यांनीही राजीनामा दिला. शिंदे यांनी ५ मे २०२४ रोजी, तर उपरकर यांनी २० ऑक्टोबर २०२४ रोजी उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र, मनसेच्या अधिकृत वेबसाइटवर अजूनही त्यांची नावे सरचिटणीस पदाच्या यादीमध्ये आहेत.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वेबसाइटमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. मुख्य पानावर प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या बाजूला शरद पवार यांचा जीवनप्रवास सांगण्यात आला आहे. बाजूला खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या फोटोशेजारी बंड करून पक्ष आणि चिन्ह आपल्यासोबत नेणारे अजित पवार यांनाही स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वेबसाइटच्या मुख्य पानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे आणि फोटो आहेत. नेत्यांच्या यादीमध्ये केवळ नरहरी झिरवाळ यांचे नाव असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांना मात्र स्थान 
मिळालेले नाही.

आमदारांची मंत्री हाेण्याची स्वप्नपूर्ती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वेबसाइटवरील मंत्र्यांच्या यादीमध्ये आमदार संतोष बांगर यांचे नाव लक्ष वेधून घेते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आ. बांगर मंत्री नव्हते. मात्र, मंत्री होण्याची त्यांची इच्छा या वेबसाइटने पूर्ण केली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही येथे जुन्याच आमदारांची यादी झळकत आहे.

वेबसाइट अपडेटची तसदी नाही
कोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही. निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षांनी विजयाच्या आनंदात तर पराभूत झालेल्या पक्षांनी हरल्याचा दुःखात वेबसाइट अपडेट करण्याची तसदी घेतली नाही असेच दिसून येते.

Web Title: Even after defection, the leaders are the same MLAs, ministers of the old party; MNS, NCP websites are still old NCP, Shivsena MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.