आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 11:24 PM2020-04-07T23:24:30+5:302020-04-08T00:05:18+5:30

तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर का घेऊन गेले?, यासंदर्भात भाजपानं काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत. 

Engineer brutally beaten up at Awhad bungalow; The BJP directly asked the government four questions vrd | आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल

आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल

Next
ठळक मुद्दे तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर का घेऊन गेले?, यासंदर्भात भाजपानं काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत. तरुणाच्या घरी जे गणवेशधारी पोलीस गेले होते ते त्या तरुणाला खोटं बोलून मंत्री महोदयांच्या खासगी बंगल्यावर का घेऊन गेले?कोरोना लॉकडाऊनचे नियम स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या आशीर्वादानं धाब्यावर बसवले जात आहेत का?

मुंबईः जितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्याने तरुणाला १० ते १५ जणांनी मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर बोलावून तरुणाला मारहाण केल्याचा भाजपानं आधीच निषेध नोंदवला आहे. त्यानंतर तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर का घेऊन गेले?, यासंदर्भात भाजपानं काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत. 

तरुणाच्या घरी जे गणवेशधारी पोलीस गेले होते ते त्या तरुणाला खोटं बोलून मंत्री महोदयांच्या खासगी बंगल्यावर का घेऊन गेले?, तरुणाच्या म्हणण्यानुसार बंगल्यावर १० ते १५ इसम पूर्वीच उपस्थित होते. म्हणजे कोरोना लॉकडाऊनचे नियम स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या आशीर्वादानं धाब्यावर बसवले जात आहेत का?, पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना मारहाण होत असेल तर महाराष्ट्राच्या गुंडगिरीला शासन-प्रशासन अभय देत आहे का?, त्या तरुणानं मंत्री महोदयांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच, पण त्याची वाट न बघता गृहनिर्माण मंत्र्यांचे समर्थक म्हणवणाऱ्यांनी कायदा हातात घेणे सोयीचे समजले. याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही ना?, अशा प्रश्नांची उत्तरं भाजपानं जितेंद्र आव्हाड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागितली आहेत. दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनीसुद्धा ट्वीट करत आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

लाठी, काठी ,सळ्या व पोलिसांच्या जीवावर तुम्हाला तरी किती दिवस राज्य करता येणार?, असं ट्विट त्यांनी केलं आहे.  तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

‘ही’ तर अतिशय गंभीर घटना; जितेंद्र आव्हाडांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फेसबुक पोस्ट का टाकली?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण 

पीडित तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे की, 5 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजण्याच्या सुमारास दोन साध्या वेषातील तर दोघे वर्दीवरील पोलीस त्यांच्या कावेसर येथील घरी आले. त्यांनी कोणतेही कारण न सांगता पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली बाहेर येण्यास फर्मावले. कारण विचारल्यानंतर मात्र दहा मिनिटांमध्ये आणून सोडतो, असे त्यांच्या पत्नीला सांगण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेत एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेण्यात आले. तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या 15 ते 20 जणांनी पोलिसांकडे असणारी फायबर काठी तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर आणि मांड्यांवर जबर मारहाण केली. त्यानंतरही लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागणार नाही, याची दक्षता घ्या, असेही घेऊन येणारे पोलीस त्याठिकाणी बजावत होते. त्यानंतर आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या करमुले यांना फेसबुकवर पोस्ट का टाकली, अशी विचारणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Engineer brutally beaten up at Awhad bungalow; The BJP directly asked the government four questions vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.