फेसबुक पोस्ट का टाकली?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 07:42 PM2020-04-07T19:42:06+5:302020-04-07T19:45:09+5:30

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Why put up a Facebook post? asking this engineer assualted in front of jitendra awhad in his bunglow in thane pda | फेसबुक पोस्ट का टाकली?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण 

फेसबुक पोस्ट का टाकली?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण 

Next
ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या आवारात तरुणाला बेदम मारहाण फेसबुकवर पोस्ट का टाकली आव्हाडांनी विचारला जाब, साध्या वेषातील पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

ठाणे : फेसबुकवर पोस्ट का टाकली? असा जाब विचारीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला काठी तुटेपर्यंत बेदम मारहाण झाल्याचा आरोप ठाण्याच्या कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुले (40) या अभियंत्याने केला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 

करमुले यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 5 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजण्याच्या सुमारास दोन साध्या वेषातील तर दोघे वर्दीवरील पोलीस त्यांच्या कावेसर येथील घरी आले. त्यांनी कोणतेही कारण न सांगता पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली बाहेर येण्यास फर्मावले. कारण विचारल्यानंतर मात्र दहा मिनिटांमध्ये आणून सोडतो, असे त्यांच्या पत्नीला सांगण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेत एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेण्यात आले. 


तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या 15 ते 20 जणांनी पोलिसांकडे असणारी फायबर काठी तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर आणि मांडयांवर जबर मारहाण केली. त्यानंतरही  लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागणार नाही, याची दक्षता घ्या, असेही घेऊन येणारे पोलीस त्याठिकाणी बजावत होते. त्यानंतर आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या करमुले यांना फेसबुकवर पोस्ट का टाकली, अशी विचारणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अतिउत्साहात आणि भावनेच्या भरात ही पोस्ट टाकली, असे सांगत त्यांनी माफीही मागितली. त्यानंतर तिथे असलेल्या एका कार्यकर्त्याच्या मोबाईलवरुन करमुले यांनी घरी फोन करुन फेसबुकवरील ती पोस्ट काढण्यास त्यांच्या पत्नीला सांगितले. 


हे संपल्यानंतरही त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. ‘मी ही पोस्ट चुकून केली आहे. त्याबद्दल माफी मागतो,’  असा व्हिडीओ देखिल रेकॉर्ड करुन घेण्यात आल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मारहाण झाल्यानंतर कथित पोलिसांनीच या तरुणाला रुग्णालयात नेले. तिथे उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले. या सर्व प्रकारानंतर करमुले यांनी वर्तकनगर पोलीस ठाणे गाठून याबाबत अपहरण, दंगल माजविणो, मारहाण करणो आणि धमकी दिल्याची तक्रार अनोळखी व्यक्तीविरुद्ध दाखल केली आहे. दरम्यान, करमुले यांच्याविरुद्धही वर्तकनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 


कशामुळे घडला प्रकार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी  दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रीयेनंतर करमुले यांनी आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे. यातूनच हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे बोलले जाते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिक्रीया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
 

ही मोगलाई आहे का शिवशाही- डावखरे
कोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाड यांच्यापासून वाचवा! कॉमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकाला आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये मारहाण झाली आहे. ही मोगलाई आहे की शिवशाही असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीटद्वारे केला आहे.

Web Title: Why put up a Facebook post? asking this engineer assualted in front of jitendra awhad in his bunglow in thane pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app