Immediately dismiss Jitendra Awhad from cabinet Devendra Fadanvis Demand to CM Uddhav Thackeray Pnm | ‘ही’ तर अतिशय गंभीर घटना; जितेंद्र आव्हाडांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’

‘ही’ तर अतिशय गंभीर घटना; जितेंद्र आव्हाडांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’

ठळक मुद्देफेसबुकवर विरोधात लिखाण करणाऱ्या युवकाला बेदम मारहाणजितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत १० ते १५ जणांनी मारहाण केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांना बडतर्फ करण्याची विरोधकांची मागणी

मुंबई – राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. या घटनेवरुन विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बडतर्फ करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हिल इंजिनिअर तरुणाने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. या प्रकरणी प्रविण दरेकर यांनी ठाणे शहरचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे संर्पक साधून संबंधितांविरुध्द तातडीने व निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फेसबुक पोस्ट का टाकली?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण 

पीडित तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे की, 5 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजण्याच्या सुमारास दोन साध्या वेषातील तर दोघे वर्दीवरील पोलीस त्यांच्या कावेसर येथील घरी आले. त्यांनी कोणतेही कारण न सांगता पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली बाहेर येण्यास फर्मावले. कारण विचारल्यानंतर मात्र दहा मिनिटांमध्ये आणून सोडतो, असे त्यांच्या पत्नीला सांगण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेत एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेण्यात आले. तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या 15 ते 20 जणांनी पोलिसांकडे असणारी फायबर काठी तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर आणि मांड्यांवर जबर मारहाण केली. त्यानंतरही लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागणार नाही, याची दक्षता घ्या, असेही घेऊन येणारे पोलीस त्याठिकाणी बजावत होते. त्यानंतर आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या करमुले यांना फेसबुकवर पोस्ट का टाकली, अशी विचारणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

Web Title: Immediately dismiss Jitendra Awhad from cabinet Devendra Fadanvis Demand to CM Uddhav Thackeray Pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.