मुंबई - विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सदस्य विधान परिषदेवर पाठवण्याची महायुती सरकारची तयारी आहे. संख्याबळ पाहता विरोधी महाविकास आघाडीला सदस्य निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक भाजपाचे सदस्य निवडून येतील इतके संख्याबळ त्यांच्याकडे आहे.
निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ पर्यंत मतदानाची वेळ असेल. या ९ जागांसाठी २३ एप्रिलला परिपत्रक निघेल. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. २ मे पर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ४ मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. १२ मे रोजी या जागांसाठी निवडणूक होईल. त्यानंतर १२ मे रोजीच संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. रात्री उशिरापर्यंत या जागांचे निकाल हाती येतील.
विधान परिषदेच्या ९ जागा १३ मे रोजी रिक्त होत आहेत. त्यात संजय केणेकर, रणजितसिंह मोहिते पाटील, उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे हे विद्यमान सदस्य निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण ७८ सदस्य आहेत. त्यातील ३० सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. त्यातील ९ जणांची मुदत येत्या १२ मे रोजी संपत आहे. नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सदस्यांचा निरोप सोहळा पार पडला.
महायुतीला ८ तर मविआच्या पारड्यात १ जागा
आमदारांच्या संख्याबळावरून विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळेल असं चित्र आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. जरी उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता असली तरी मविआमध्ये एका जागेसाठी रस्सीखेच असेल. काँग्रेस एका जागेसाठी अडून बसली तर मविआत पेच निर्माण होईल. भाजपा व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या अतिरिक्त मतांच्या आधारे महायुतीची आठवी जागा निवडून येऊ शकते.
Web Summary : Maharashtra Legislative Council elections for nine seats are scheduled for May 12. MahaYuti aims to win maximum seats, while MVA faces challenges due to numbers. BJP likely to secure the most wins. MahaYuti may secure eight seats, leaving one for MVA.
Web Summary : महाराष्ट्र विधान परिषद की नौ सीटों के लिए 12 मई को चुनाव होंगे। महायुति का लक्ष्य अधिकतम सीटें जीतना है, जबकि एमवीए को संख्या बल के कारण चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। भाजपा के सबसे अधिक सीटें जीतने की संभावना है। महायुति को आठ सीटें मिल सकती हैं, एमवीए के लिए एक।