Election is not in Kashmir, it is from Maharashtra! : Sachin Sawant to amit shah | निवडणूक काश्मीरची नाही, महाराष्ट्राची आहे! : सचिन सावंत
निवडणूक काश्मीरची नाही, महाराष्ट्राची आहे! : सचिन सावंत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांकडून काश्मीरचा राग आलापला जात आहे. शाह यांनी काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल मुंबईत येऊन व्याख्यान देण्याचा प्रयत्न केला. याची खिल्ली उडवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ही निवडणूक महाराष्ट्राची आहे, काश्मीरची नव्हे, याची आठवण करून दिली. 


शहा यांनी आज मुंबईत केलेल्या 34 मिनिटांच्या भाषणावेळी 51 वेळा काश्मीरचा उल्लेख केला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे. कलम ३७० हटवल्याबद्दलचे व्याख्यान अमित शाह यांनी काश्मीरमध्ये जाऊन द्यावे महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्रामध्ये कलम ३७० नसून कलम ३७१ आहे, याची आठवण सचिन सावंत यांनी करून दिली.


यासंदर्भात सावंत म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रावरील कर्जात दुप्पट वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. राज्यातील लघू व मध्यम उद्योग बंद होण्याची संख्या चौपट झाली आहे. बेरोजगारी दहापट वाढली आहे. भ्रष्टाचार शतपटीने वाढला आहे. या सरकारची थापेबाजी हजार पटीने वाढली आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांनी बोलावे. राज्यातील भाजपच्या अनैतिक राज्य कारभारावर, फोडाफोडीच्या राजकारणावर बोलावे, किंबहुना विकासाच्या गमजा मारणाऱ्या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रथाचे चाक चिखलात का रूतले? यावर बोलावे असे जाहीर आव्हान सावंत यांनी दिले. 


भाजपने या निवडणुकीत मुद्दे भरकटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला भेडसवणाऱ्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटू देणार नाही, असेही सावंत म्हणाले.


Web Title: Election is not in Kashmir, it is from Maharashtra! : Sachin Sawant to amit shah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.