"...म्हणून मला खूप आनंद झाला"; एकनाथ शिंदेंच्या नावाच्या घोषणेनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:26 IST2022-06-30T18:26:10+5:302022-06-30T18:26:10+5:30
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.

"...म्हणून मला खूप आनंद झाला"; एकनाथ शिंदेंच्या नावाच्या घोषणेनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. त्यांना भाजपाचा पाठिंबा देणार असून या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकीकडे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा असतानाच फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक लगावत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या नावाच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अनेक वर्ष एकत्र काम केले म्हणून मला आनंद आहे. खूप खूप शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
मा.एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 30, 2022
अनेक वर्ष एकत्र काम केले म्हणून मला आनंद आहे ... ......
खूप खूप शुभेच्छा@mieknathshinde
काय म्हणाले शिंदे?
“जो विश्वास भाजपनं आमच्या ५० आमदारांवर दाखवलाय तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्या ५० आमदारांच्या जोरावर ही लढाई लढलोय त्यांचे आभार मानतो. ज्या ५० लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो कदापि तोडणार नाही. जो यापूर्वी त्यांना अनुभव आला तोही त्यांना येऊ देणार नाही याची खात्री करेन,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.