दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार, केली विशेष विमानाची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:37 IST2026-03-03T12:12:12+5:302026-03-03T12:37:51+5:30
Eknath Shinde: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार, केली विशेष विमानाची व्यवस्था
मुंबई - इराणविरोधात इस्राइल आणिअमेरिकेने सुरू केलेल्या तीव्र संघर्षामुळे आखाती देशांमधील हवाई क्षेत्र बंद पडले आहे. त्यामुळे दुबईसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.
या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट (Fujairah Airport) वरून उड्डाण घेणार आहेत:
- VTGSO – संध्याकाळी ३.३० वाजता टेकऑफ
- VT GSH – संध्याकाळी ४.३० वाजता टेकऑफ
या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.