महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 07:52 IST2025-12-05T07:52:26+5:302025-12-05T07:52:51+5:30
देवेंद्र फडणवीस यांचे ऐकायचे नसेल तर तो तुमच्या पक्षातंर्गत प्रश्न आहे. आम्ही काय बोलणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्हालाही त्याचपद्धतीने उत्तर द्यावे लागेल असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिला.

महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
मुंबई - राज्यात सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना देण्यात येणाऱ्या पक्षप्रवेशामुळे महायुतीत तणाव वाढला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपाकडून शिंदेसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे शिंदेसेना आक्रमक झाली आहे. शिंदेसेनेने थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करत भाजपाला इशारा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, महायुतीत वरिष्ठांमध्ये एक आचारसंहिता ठरली आहे. आपापसात एकमेकांचे नेते घ्यायचे नाहीत मात्र स्थानिक निर्णयामुळे झालेला हा गोंधळ आहे. आम्ही वारंवार युती करा असं सांगतो मात्र काही नेते स्थानिक नेतृत्वावर युती करायची की नाही हे ठरवले जाईल असं बोलायचे. त्यामुळे प्रत्येक नेते एकमेकांविरोधात उभे आहेत. दुर्दैवाने नगरपालिकेची ही निवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची झाली आहे. यापुढे छोट्या निवडणुकीत जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो उभं राहण्याची हिंमत करणार नाही असं खेदाने म्हणावे वाटते. एवढा खर्चाचा आगडोंब मी माझ्या राजकीय कारर्किर्दीत पहिल्यांदा पाहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली. प्रत्येक जण टोकाचा विरोध करू लागलेत. येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचे पडसाद निश्चित उमटतील असं त्यांनी सांगितले.
तसेच विरोधक ही निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा वणवा जाणवत होता. उबाठाने कुठेही सभा घेतली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, मूळ काँग्रेस असेल कुठेही सभा घेताना दिसले नाही. त्यामुळे जे सत्ताधारी आहेत त्यांच्यात स्पर्धा लागली आणि अस्तित्वाची लढाई जाणवली. महायुतीत जे ठरवले गेले त्याला कल्याण डोंबिवलीत छेद देण्यात आला. रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम अॅक्शनला रिअॅक्सन होणार आहे. महायुती जी खंबीरपणाने पुढे चालली आहे त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. रवींद्र चव्हाणांना समज दिली जात नसेल तर उद्या हे प्रकार वाढतील आणि त्याचे दुष्परिणाम महायुतीला भोगावे लागतील असा इशाराही मंत्री संजय शिरसाट यांनी दिला.
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी खरेतर महाराष्ट्र फिरला पाहिजे परंतु त्यांना कल्याण डोंबिवली यापलीकडे दिसत नाही. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी बाहेर फिरले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचे ऐकायचे नसेल तर तो तुमच्या पक्षातंर्गत प्रश्न आहे. आम्ही काय बोलणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्हालाही त्याचपद्धतीने उत्तर द्यावे लागेल. सर्वसामान्य जनतेचा महायुतीकडे कल आहे. जर अशाप्रकारे फाटाफूट होत असेल तर भविष्यात स्वतंत्र निवडणूक लढावी लागेल असं चिन्ह आहे असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं.