काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:59 IST2025-12-22T07:58:40+5:302025-12-22T07:59:19+5:30
उमरगा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किरण गायकवाड यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती.

काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
मुंबई - नगरपरिषद आणि नगरपालिकांचे निकाल हाती आले आहेत. त्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला आहे. मात्र या निवडणुकीत अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि युती पाहायला मिळाल्या. बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे होते. या निवडणुकीत राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या उमरगा नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेना आणि काँग्रेस आघाडीला ऐतिहासिक यश मिळालं आहे. याठिकाणी नगराध्यक्षपदासह तब्बल १८ जागांवर विजय मिळवत आघाडीने आपले वर्चस्व निर्माण केले तर सातारा येथील कराड नगरपालिकेतही शिंदेसेनेने भाजपाला दणका दिला.
उमरगा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किरण गायकवाड यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत ३९७६ मतांचे लीड गायकवाड यांनी घेतले. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच गेली. अखेर त्यांनी ११ हजार ६६० मते मिळवून भाजपाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य यांचा ६ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे गायकवाड यांना मिळालेली ही मते भाजपा, उद्धवसेना आणि वंचित या तिन्ही उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षाही जास्त होती. या निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा फटका बसला. त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल रजाक अत्तार यांच्यासह सर्व २५ उमेदवार पराभूत झाले.
कराड येथेही शिंदेसेनेचे नगराध्यक्ष विजयी
सातारा जिल्ह्यातील कराड येथे नगराध्यक्षपदी शिंदेसेनेचे राजेंद्रसिंह यादव निवडून आले आहेत. त्यांना २४ हजार ९६ मते पडली. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शिंदेसेना आणि इतर स्थानिक पक्ष मिळून लोकशाही यशवंत आघाडी बनवली होती तर काँग्रेस आणि भाजपा स्वबळावर लढत होते. कराड उत्तर आणि कराड दक्षिण दोन्ही मतदारसंघात भाजपाचे आमदार आहे. त्यात कराड नगरपालिकेत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या यशवंत आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव विजयी झाले आहेत. लोकशाही आघाडीचे १२, यशवंत विकास आघाडी ६, भाजपा ११ आणि अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत.