शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:25 IST2025-11-23T12:22:52+5:302025-11-23T12:25:52+5:30
आता अती होतंय, आम्ही जे काही सहन करतोय ते राणे साहेबांसाठी, बाकी कुणासाठी नाही असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
मालवण - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर इतका राग का ते माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यात २० हून कमी जागा भाजपा लढवतेय, तिथे युती केली परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही ५०-५० टक्के जागा देत होतो, मात्र युती केली नाही असं सांगत शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आगपाखड केली आहे.
आमदार निलेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ आमदार आहेत, त्यातील २ आमदार आमचे आहेत, एक आमदार भाजपाचे आहे. आम्ही आमचा अधिकार मागणारच..मी भाजपात असताना चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पाहिले आहे. हे लोक कधी २-३ जिल्ह्यांचे प्रदेशाध्यक्ष नव्हते. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष म्हणून येतात, ३-३ दिवस सिंधुदुर्गात असतात. महाराष्ट्रात आजच्या घडीला २७५ ठिकाणी नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यात आता ९ दिवस उरलेत परंतु ते तिथे जात नाही. सिंधुदुर्गात बसायचे, इकडे काय काय करायचे...आता ते काय करतायेत हे मी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे असा इशारा त्यांनी दिला.
तसेच आता अती होतंय, आम्ही जे काही सहन करतोय ते राणे साहेबांसाठी, बाकी कुणासाठी नाही. महायुतीचा धर्म पाळायचा असं एकनाथ शिंदेंनी सांगितले परंतु उगाच राग काढला जातोय, एकच माणूस असा वागतोय, बाकी देवेंद्र फडणवीस हे खूप प्रेम देतात, सांभाळून घेतात. त्यांच्याबाबत अजिबात दुमत नाही. इतर कुठल्याही भाजपा नेत्यांबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही. परंतु एका व्यक्तीमुळे ही युती तुटत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा जिल्हा राणे साहेबांना मानणारा आहे. राणे भाजपात आल्यानंतर इथे पक्षाची ताकद वाढली, त्याआधी पक्षाची काय अवस्था होती हे पाहावे. राणेंचे कार्यकर्ते भाजपात आहेत, तसेच आमच्या इथेही त्यांना मानणारे आहेत. जिल्ह्याचे राजकारण पाहिले तर भाजपा-शिंदेसेनेत राणेंची माणसे आहेत. इथे आम्हाला काही समस्या नाही परंतु अडचण एकाच व्यक्तीला आहे असं सांगत निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाणांवर घणाघात केला.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी माझ्यावर फार मोठे उपकार केलेत, मी १० वर्ष कुठेच नव्हतो, २ निवडणूक हरलो होतो. हा आता काहीच करू शकणार नाही, जिंकू शकणार नाही अशी ओळख समाजात झाली होती. त्यात अशा माणसाला एकनाथ शिंदेंनी तिकिट दिले, निवडून आणले. त्यामुळे उरलेले माझे आयुष्य हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे. शिंदेंनी माझ्यासाठी जे केले ते विसरू शकणार नाही. शिवसेना हा आमचा डिएनए आहे. ती मूळ ओळख आहे असं आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.