सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाचा शेवट एका शीघ्र कवितेने केला. शिंदे म्हणाले, ‘ज्याला कळले संविधान, त्याचे सुटत नाही कधी भान... ज्याचा असतो नेक इरादा, त्यालाच कळतो खरा कायदा...’ शिंदे यांनी ही कविता म्हणताच व्यासपीठावर बसलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे सगळे बघून हसू लागले. सरन्यायाधीशांसह मुख्यमंत्री, व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आणि मध्यवर्ती सभागृहात उपस्थित असलेल्या आमदारांमध्ये हास्य पिकले. शिंदेंच्या हे लक्षात आल्यावर, ‘आठवले साहेबांनी आठवण केली’ असे शिंदे म्हणाले.
म्हणून.. आठवले विधान भवनात
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळातर्फे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले विधान भवनात आले होते. विधानभवनात काही आमदार त्यांना पाहून पुढे सरसावले. साहेब आज विधान भवनात अशी त्यांनी विचारणा केली. त्यावर आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. ‘आज आहे सत्कार सोहळा हे सकाळी आठवले. म्हणून आठवले विधानभवनात आले,’ असे म्हणून ते लिफ्टकडे वळले. त्यांच्या शीघ्र कविता नेहमीच ऐकत आलो पण, आज त्याचा अनुभव घेता आला, अशी कुजबुज होती.
लाइट लागली नाही, बिल भरले नाही?
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तारांकित प्रश्नोत्तरांचा तास महत्त्वाचा मानला जातो. या आयुधाच्या माध्यमातून अनेक सदस्य आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडून त्यावर मंत्र्यांकडून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतात. विधान परिषदेत मंगळवारी हा तास सुरू होता. सदस्य प्रश्न विचारत होते, त्याला मंत्री उत्तर देत होते. अचानक विरोधी पक्षनेत्यांनी माईक बंद असल्याचे सभापतींच्या निदर्शनास आणले. त्यावर त्यांनी विरोधी पक्षनेत्यांचा माईक कसा बंद झाला? काही तांत्रिक बाब आहे का? तपासून पाहा, असे म्हटले. काही वेळाने पुन्हा माईक बंद पडल्याची तक्रार आली. याचवेळी काही सदस्यांमध्ये माईकची लाईट लागली नाही. बिल भरले नाही का? अशी कुजबुज सुरु होती.
दादांचे आदेश बुडविले ‘खाडीत’
नवी मुंबईतील लोटस तलावात भराव टाकण्याचे आपले पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतर सिडकोने थांबविले आहे. अशातच पर्यावरणप्रेमींनी जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक उर्फ दादा यांची भेट घेतल्यानंतर नाईक यांनी आठवड्यात या तलावातील भराव काढून तो पूर्ववत करण्याचे आदेश सिडकोस दिले होते. परंतु, दोन आठवडे होत आले तरी दादांच्या आदेशांना सिडकोने जुमानलेले दिसत नाही. या भरावाविरोधात पर्यावरणप्रेमींनी तलावाकाठी एकत्र येऊन आंदोलनाचे चौथे सत्रसुद्धा पूर्ण केले आहे. परंतु, पावसाळी अधिवेशन सुरू असूनही सिडकोवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. यामुळे दादांचे आदेश सिडकोने वाशीच्या खाडीत बुडविले की काय अशी चर्चा असून, त्यावर ते काय पवित्रा घेतात, याकडे लक्ष लागले आहे.