रत्नागिरी - राज्य सरकारच्या मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकल्यानंतर शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत थेट अमित शाहांकडे तक्रारीचा पाढा वाचला. यात प्रामुख्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर रोष व्यक्त केला. रवींद्र चव्हाण वैयक्तिक स्वार्थासाठी महायुतीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप केला. मात्र शिंदेसेनेतील मंत्री उदय सामंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं भरभरून कौतुक केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
रत्नागिरीतील एका कार्यक्रमात मंत्री उदय सामंत म्हणाले की, आज आमच्या कोकणातील एक सहकारी जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी बसला आहे. हे आमच्यासाठी आणि कोकणवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. आपण नुसती युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे. प्रत्येक नगरपालिका, नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकला पाहिजे या भावनेनतून महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीतून सुरू केला. त्याबद्दलही मला आभार मानायचे आहेत. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय चाललंय हे पाहण्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्याने बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा विचार आजही तशाच्या तसा ठेवला आहे याचे घोतक आहे. भाजपासारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांपेक्षा पदाने आणि मानाने रवींद्र चव्हाणच मोठे आहेत त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही असं त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंनी मांडली होती तक्रार
भाजपाचे नेते आमचा पक्ष संपवत असल्याने शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. जवळपास ५० मिनिटे या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत शिंदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची तक्रार केली. सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात शिंदेसेनेच्या अनेक माजी पदाधिकारी, नगरसेवकांना गळाला लावण्याचं काम रवींद्र चव्हाण यांच्याकडून केले जात आहे. आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडून भाजपात प्रवेश दिला जात आहे. हे राजकारण आगामी निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणू शकते. त्यातून वातावरण दूषित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. काही नेते त्यांच्या स्वार्थासाठी हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे विरोधकांना त्याचा अनावश्यक फायदा मिळत आहे असं सांगत शिंदेंनी रवींद्र चव्हाण यांच्याविषयी शाहांकडे तक्रार दिली होती.
दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने रवींद्र चव्हाण यांची पाठराखण केली. आरोप-प्रत्यारोप होतच राहतील तुम्ही पक्ष बांधणीचे काम सुरूच ठेवा, अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात भाजपाची विजयी घोडदौड चांगल्या पद्धतीने ठेवा असं केंद्रीय नेतृत्वाने भाजपा नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे शिंदेंनी तक्रार केल्यानंतरही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना बळ देण्याचं काम केल्याचं दिसून येते.
Web Summary : Eknath Shinde complained about Ravindra Chavan to Amit Shah, alleging he's disrupting the alliance. Uday Samant, however, praised Chavan's leadership in Ratnagiri, highlighting his contributions to the BJP and the Mahayuti alliance, causing surprise.
Web Summary : एकनाथ शिंदे ने अमित शाह से रवींद्र चव्हाण की शिकायत की, आरोप लगाया कि वे गठबंधन को बाधित कर रहे हैं। उदय सामंत ने रत्नागिरी में चव्हाण के नेतृत्व की प्रशंसा की, जिससे आश्चर्य हुआ।