"आम्ही घाबरत नाही.."; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:25 PM2022-08-18T14:25:00+5:302022-08-18T14:26:45+5:30

सरकारची शेतकऱ्यांना मिळणारी मदत केवळ कागदावरच असल्याचाही आरोप

Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government gets challenge from NCP Leader Jayant Patil over Irrigation Scam Mohit Kamboj Tweet | "आम्ही घाबरत नाही.."; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा

"आम्ही घाबरत नाही.."; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा

googlenewsNext

Jayant Patil: नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असे ट्विट भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अशा ट्वीटचा अर्थ काय, यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून राज्यात पुन्हा विविध गोष्टींची चर्चा सुरु झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून ट्विट करण्यात आलेला हा बडा नेता कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी सरकारने काहीही केले तरी आम्ही घाबरणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

"मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी सिंचन चौकशीच्या वावड्या उठवल्या जात आहेत. १५ वर्षे जुन्या गोष्टी उकरून काढून विरोधकांना बदनाम करण्याची ही चाल आहे. सध्याच्या सरकारचे हेच काम आहे असे दिसते. पण काहीही केले तरी आम्ही घाबरत नाही. आम्ही विरोधक म्हणून आमची जबाबदारी निश्चितच पार पाडू", असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

"अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या अशी मागणी सातत्याने आम्ही विरोध पक्षातील नेते मंडळी करत आहोत. शिंदे-फडणवीस यांचे सरकार म्हणतंय मदत करतो, मात्र मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणे जास्त आणि कामात शून्य, असा सारा प्रकार दिसतोय. सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, मंत्र्यांची खाती वाटून घेण्यातच हे व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे या सरकारचे दुर्लक्ष होताना साफ दिसत आहे", असा सणसणीत टोलादेखील त्यांनी लगावला.

दरम्यान, मोहित कंबोज यांच्या ट्वीटबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनीही भाजपाला टोला लगावला. "भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचा, मराठी लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता-करता आणि त्यांच्यावर ईडीची चौकशी लावता-लावता स्टॉक आता संपला आहे. म्हणून त्यांनी मोहित कंबोज नावाच्या एका नव्या, दुसऱ्या माणसाला समोर आणलं आहे. जो काही अत्याचार होतोय, अन्याय होतोय, ईडीची कारवाई सर्वांवर होतेय हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रची जनता पाहते आहे. योग्य वेळी महाराष्ट्राची जनता या साऱ्या प्रकाराला उत्तर देईल", अशा शब्दांत जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला.

Web Title: Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government gets challenge from NCP Leader Jayant Patil over Irrigation Scam Mohit Kamboj Tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.