Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:32 IST2025-07-27T12:32:25+5:302025-07-27T12:32:41+5:30
Eknath Khadse : हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
पुण्यातील हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आले आहे. पुण्यातील खराडीतील एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी करण्यात येत होती. प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच दरम्यान एकनाथ खडसे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणं हे चुकीचं होईल. त्यामुळे नंतर मी पत्रकार परिषद घेईन. तथ्य समोर येईल. यामध्ये जावई असो किंवा कोणीही असो जर दोषी असेल तर शासन झालंच पाहिजे. पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येऊद्या. मला यावर अधिक भाष्य करायचं नाही" असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
"राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण"
रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावर ट्वीट केलं आहे. "पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु हनीट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु #हनी_ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या मा. खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2025
रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्याकडे याबाबत माहिती नाही . मी काल पंढरपूरला होतो. रात्री उशिरा मी नाशिकला आलो. एकनाथ खडसे यांचे जावई रेव्ह पार्टीमध्ये होते ही बातमी मी टीव्हीवर पाहिली. प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते. त्यांनी ही पार्टी आयोजित केली होती. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळाले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तिथल्या पोलिसांशी अद्याप संपर्क झालेला नाही. टीव्हीवरूनच मला याबाबत माहिती मिळाली" असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.