ED at Sanjay Raut Residence: "...मोठी कारवाई करायचीय"; एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया टाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 12:01 IST2022-07-31T11:59:17+5:302022-07-31T12:01:11+5:30
Eknath Shinde on ED at Sanjay Raut Residence: एकनाथ शिंदे रात्री उशिराने दिल्लीहून औरंगाबादला आले आहेत. आज ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.

ED at Sanjay Raut Residence: "...मोठी कारवाई करायचीय"; एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया टाळली
संजय राऊत यांना ईडी कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकते. एकीकडे राऊतांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांवरील ईडी कारवाई थांबल्याचा आरोप केलेला असताना राऊत यांच्या भांडूप येथील घरी ईडी दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ईडीच्या कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
एकनाथ शिंदे रात्री उशिराने दिल्लीहून औरंगाबादला आले आहेत. आज ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांना मुंबईतील संजय राऊतांवरील ईडी कारवाईबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी इथे विकासकामांची मोठी कारवाई करायचीय असे उत्तर देत राऊतांवरील प्रतिक्रिया टाळली आहे.
दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांनी राऊतांवरील कारवाई ही आनंदाची बातमी असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे. “ईडीची एवढीमोठी धाड पडते तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, महाराष्ट्राला त्रास झालाय, शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आज आनंदी आहेत, शिवसैनिक आनंदी आहेत. ते काही मास लीडर नाही, प्रवक्ते आहेत. त्यामुळे काही मोठा उठाव होईल असं वगैरे वाटत नाही,” असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट म्हणाले.
औरंगाबाद दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी औरंगाबादेत मुक्कामी येणार होते. मात्र अचानक या दौऱ्यात बदल झाला आणि ते शनिवारी रात्री औरंगाबादहुन दिल्लीला गेले. रात्री उशिरा २ वाजेपर्यंत ते पुन्हा औरंगाबादमध्ये परत येतील , असे नियोजन विमानतळाला प्राप्त झाले होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचे विमान दिल्लीहून औरंगाबादेत दाखल झाले.