Dy CM Ajit Pawar Speech in Baramati | ...तर बायको मला हाकलून देईल; अजितदादांनी सांगितली कार्यकर्त्यांना 'प्रेमळ' अडचण
...तर बायको मला हाकलून देईल; अजितदादांनी सांगितली कार्यकर्त्यांना 'प्रेमळ' अडचण

पुणे - उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी बारामतीत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिलखुलास भाषण केलं. बारामतीतील लोकं मुंबईला येतात तेव्हा थोडा नाराज होतो, अद्याप देवगिरी बंगला मिळाला नाही, त्यामुळे ज्या घरात मी राहतो ते घर लहान आहे असं दादांनी सांगितले. साखर कारखान्याच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबईत घर एकतर लहान आहे, तिथं बसायला जागा नाही, हॉलमध्ये गर्दी झाली की, डायनिंगमध्ये बसायला लागतं, तिथं गर्दी झाली की जयच्या बेडरुममध्ये बसायला लागतं. आता फक्त माझ्या बेडरुममध्ये बसायचं बाकी आहे, तिथं नेलं तर बायको हाकलून देईल असं सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

तसेच थोडं दमानं घ्या, दोन-चार दिवसात देवगिरी रिकामा होईल, १०० दिवसांत काय केलं बाबानं, कुणास ठाऊक, अद्याप घर खाली केलं नाही असं सांगत अजित पवारांनी भाजपाच्या माजी मंत्र्याला टोला लगावला आहे.  

भाजपा सरकारच्या काळात माजी अर्थमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला राहण्यासाठी दिला होता. नवीन सरकार आल्यापासून १०० दिवस झाले तरी मुनगंटीवारांनी अद्याप देवगिरी बंगला रिकामा केला नाही. त्यामुळे अजित पवार सध्या चर्चगेटच्या एका इमारतीत वास्तव्यास आहेत. मंत्रालयातील विविध शासकीय कामांसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी येत असतात. 
 

Web Title: Dy CM Ajit Pawar Speech in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.