पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांची बनवाबनवी!दानपेटीत मिळाल्या रद्द झालेल्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:03 IST2017-09-11T14:53:14+5:302017-09-11T15:03:04+5:30
लालबागच्या राजाप्रमाणे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांनी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे.

पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांची बनवाबनवी!दानपेटीत मिळाल्या रद्द झालेल्या नोटा
पुणे, दि. 11 - लालबागच्या राजाप्रमाणे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांनी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे. मंडळाने गणपतीसमोर ठेवलेली दानपेटी उघडल्यानंतर त्यात पाचशे, हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा सापडल्या आहेत. जुन्या नोटांमधील रक्कम 25 हजाराच्या घरात आहे. एबीपी माझा वाहिनीने हे वृत्त दिले आहे.
यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीला साडेतीन कोटी रुपयांचे दान आले. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पुन्हा जमा करण्यासाठी एक मुदत दिली होती. ज्यांना ठरलेल्या मुदतीत ही रक्कम जमा करता आली नाही अशा भक्तांनी स्वत:कडे राहिलेल्या नोटा गणेशाच्या चरणी अर्पण केल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी लालबागच्या राजासमोर ठेवण्यात आलेली दानपेटी उघडल्यानंतही असाच प्रकार समोर आला होता. लालबागचा राजा गणपतीच्या दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजाराच्या ११० जुन्या नोटा सापडल्या. ज्या नोटांचं एकुण मुल्य १ लाख १० हजार इतकं आहे.
दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड
25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा कमी दान
यंदा लालबागच्या दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली असली, तरी ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. कारण गेल्यावर्षी ही रक्कम तब्बल 8 कोटी इतकी होती. यावर्षी 29 ऑगस्टला झालेल्या तुफान पावसामुळे भाविकांनी घरी राहणंच पसंत केलं होतं. त्यामुळे यंदा रोख रक्कम कमी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच नोटाबंदीचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.
5.8 कोटी रुपये, 5.5 किलो सोनं, 70 किलो चांदी
लालबागच्या दरबारात भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये रोख रकमेसह तब्बल 5.5 किलो सोनं आणि 70 किलो चांदीचा समावेश आहे.
लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमत
लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलाव शनिवारी दहाच्या सुमारास संपला .एकूण 82 लहान-मोठ्या अंलकारांचा लिलाव करण्यात आला. लिलाव करण्यात आलेल्या अलंकारांचे एकूण मूल्य 98 लाख 48 हजार एवढे आहे. सोन्याच्या वीटेला सर्वाधिक म्हणजेच 31 लाख 25 हजारांची किंमत मिळाली तर सोन्याच्या गणेशमूर्तीला 14 लाख 50 हजार एवढी किमत मिळाल्याची माहिती सुधीर साळवी यांनी दिली.