तापमानवाढीमुळे माेसमाचे चक्र बदलल्याने दुष्काळ, पाण्याची टंचाई; रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 07:51 IST2025-11-24T07:50:37+5:302025-11-24T07:51:07+5:30
येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियानुसार, देशस्तरावर ९१ टक्के लोकांनी जागतिक तापमानवाढीबाबत चिंता व्यक्त केली असली, तरी जागतिक तापमानवाढ ही मुख्यतः मानवी कृतींमुळे होत असल्याचे फक्त ५५ टक्के लोकांना वाटते.

तापमानवाढीमुळे माेसमाचे चक्र बदलल्याने दुष्काळ, पाण्याची टंचाई; रिपोर्टमधून खुलासा
मुंबई : राज्यातील ८७ टक्के नागरिकांनी जागतिक तापमानवाढीचे परिणाम स्वतः अनुभवल्याचे सांगितले असून, ७७ टक्के जणांना तापमानवाढीचा मान्सूनवर परिणाम होत असल्याचे वाटते. तर, ८२ टक्के जणांनी या समस्येमुळे दुष्काळ व पाणीटंचाई जाणवते, असे सांगितले. हे प्रमाण देशातील सर्वाधिक पातळीवरील असल्याचे येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियाच्या अहवालातून समोर आले.
सप्टेंबरमध्ये राज्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. अनेक जिल्ह्यांतील जीवन विस्कळीत झाले. बदलत्या हवामानाचा शहरे आणि शेतकऱ्यांवर परिणाम होत आहे. अनियमित पाऊस आणि मान्सूनचा बदललेला पॅटर्न यामुळे पिकावर परिणाम होत असून, मुंबईपासून मराठवाड्यापर्यंतच्या नागरी पायाभूत सुविधांवर ताण येत आहे.
९० टक्के दिवस तीव्र हवामानाच्या घटना
२०२४ मध्ये भारतात ३२२ दिवस म्हणजे वर्षभरातील ९०% दिवस तीव्र हवामानाच्या घटना नोंद झाल्या. राष्ट्रीय स्तरावर, बहुतेक लोकांनी १२ महिन्यांत तीव्र उष्णतेच्या लाटा (७१ टक्के), शेतीवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव (५९ टक्के), वीजपुरवठा खंडित होणे (५९ टक्के), पाण्याचे प्रदूषण (५३ टक्के), दुष्काळ व पाण्याची टंचाई (५२ टक्के) आणि तीव्र हवा प्रदूषण (५१ टक्के) यांचा वैयक्तिक अनुभव आल्याचे सांगितले.
हवामानाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील लोक वातावरण बदलाबाबत काय विचार करतात आणि त्यांचा अनुभव काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. - डॉ. जगदीश ठाकर, प्रकल्प प्रमुख
तापमानवाढीबाबत भारतीयांना काय वाटते?
तीव्र उष्णतेच्या लाटा ७८%
दुष्काळ व पाणीटंचाई ७७%
तीव्र चक्रीवादळे ७३%
मोठ्या पुरांच्या घटना ७०%