पुणे : आगामी आठवड्यात मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता नसल्याने आधीच दुष्काळाची स्थिती असलेल्या मराठवाड्यातील स्थिती आणखी गडद होण्याची शक्यता आहे़. आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाला आहे़. नांदेड जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पाऊस कमी झाला असून या पुढील काळात आणखी पावसाची शक्यता नसल्याने या जिल्ह्यातील रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याची समस्या पुढील काळात गंभीर बनण्याची शक्यता आहे़. हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे़. २६ सप्टेंबर अखेर देशभरात ९ टक्के कमी पाऊस झाला आहे़ पूर्व भारत आणि उत्तरपूर्व भारतात सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाला आहे़ २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोंबर या कालावधीत कर्नाटक, केरळ, तामिळनाडु आणि लक्ष्यद्वीप या परिसरात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा या परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. महाराष्ट्रात आतापर्यंत पडलेल्या पावसानुसार सरासरीपेक्षा ७ टक्के पाऊस कमी झाला आहे़. मॉन्सून आता परतीच्या वाटेवर असून या काळात राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही़. पुढील काही दिवसात तुरळक ठिकाणी सायंकाळच्या वेळी अचानक पाऊस होण्याची शक्यता आहे़. मात्र, हा पाऊस विस्तृत प्रदेशावर होणार नसून तो स्थानिक स्वरुपात असेल़ त्यामुळे राज्यातील पावसाची विशेषत: मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे़. दुष्काळसदृश्य स्थिती असलेले झालेले जिल्हे : सोलापूर (-३९), बीड (-३१), सांगली (-२९), उस्मानाबाद (-२२), लातूर (-२८), नंदूरबार (-३१), धुळे (- २०), बुलढाणा (-२६), औरंगाबाद (-३०), जालना (-२८), परभणी (- २१), अहमदनगर (-२१) याशिवाय हिंगोली (- १७), जळगाव (-१९), अमरावती (-१९), यवतमाळ (-१५) या जिल्ह्यातही पाऊस कमी झाला आहे़ गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़. येत्या २४ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वीजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतचा समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे़ असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती आणखी गडद : १२ जिल्ह्यांत पाऊस कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 21:22 IST
आगामी आठवड्यात मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता नसल्याने आधीच दुष्काळाची स्थिती असलेल्या मराठवाड्यातील स्थिती आणखी गडद होण्याची शक्यता आहे़.
मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती आणखी गडद : १२ जिल्ह्यांत पाऊस कमी
ठळक मुद्देराज्यात ७ टक्के कमी पाऊस२६ सप्टेंबर अखेर देशभरात ९ टक्के कमी पाऊस रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याची समस्या पुढील काळात गंभीर बनण्याची शक्यता महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतचा समुद्र खवळलेला असण्याची शक्यता