“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:08 IST2025-10-26T13:06:57+5:302025-10-26T13:08:51+5:30
साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरुन राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
Rahul Gandhi on Satara Doctor Suicide Case: साताऱ्याच्या फलटण तालुक्यात पोलिसांच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने राज्यभर संताप उसळली आहे. मृत डॉ. संपदा मुंडे यांनी सुसाइड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या
राहुल गांधींनी रविवारी (26 ऑक्टोबर 2025) ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “महाराष्ट्रातील साताऱ्यात बलात्कार आणि अत्याचारामुळे त्रस्त होऊन एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. ही घटना कोणत्याही सभ्य समाजाच्या अंतःकरणाला हादरा देणारी आहे. ही तरुण आणि कुशल डॉक्टर समाजातील इतरांचे दु:ख दूर करण्याचे स्वप्न पाहत होती; परंतु सत्तेच्या भ्रष्ट आणि गुन्हेगार संरचनेच्या पंजात सापडली. ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे.”
महाराष्ट्र के सतारा में बलात्कार और उत्पीड़न से तंग आकर डॉ. संपदा मुंडे की आत्महत्या किसी भी सभ्य समाज की अंतरात्मा को झकझोर देने वाली त्रासदी है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 26, 2025
एक होनहार डॉक्टर बेटी, जो दूसरों का दर्द मिटाने की आकांक्षा रखती थी, भ्रष्ट सत्ता और तंत्र में बैठे अपराधियों की प्रताड़ना का शिकार…
सरकारवर गंभीर आरोप
राहुल गांधींनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत म्हटले, “ज्यांच्या हातात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्याच लोकांनी या निरपराध डॉक्टरवर सर्वात घृणास्पद अत्याचार केला. बातम्यांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचारात सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. ही सत्ता-प्रणीत गुन्हेगारी विचारसरणीचे सर्वात कुरूप उदाहरण आहे.”
ते पुढे म्हणतात, “जेव्हा सत्ताधारी गुन्हेगारांचे रक्षक बनते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची? या घटनेने महाराष्ट्रातील भाजप सरकारचा अमानवी आणि असंवेदनशील चेहरा उघड झाला आहे. आम्ही या लढाईत पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत. भारतातील प्रत्येक मुलीला भीती नव्हे, न्याय मिळायला हवा,” अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
"मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील तणावात अडकली होती. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर तिच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. मृत डॉक्टरच्या सुसाइड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच घरमालकाच्या मुलगा प्रशांत बनकर याचाही उल्लेख असून, दोघांनीही पोलिसांनी अटक केली आहे.