पती अनंत गर्जेच्या दारातच गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 07:16 IST2025-11-25T07:12:25+5:302025-11-25T07:16:54+5:30
Dr. Gauri Palve Anant Garje Case : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्यावर मोहोज देवढे येथील सासरच्या घरासमोर सोमवारी सकाळी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपी अनंत गर्जे याला अटक करण्याची मागणी नातेवाइकांनी केली.

पती अनंत गर्जेच्या दारातच गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
पाथर्डी (जि. अहिल्यानगर) - राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्यावर मोहोज देवढे येथील सासरच्या घरासमोर सोमवारी सकाळी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपी अनंत गर्जे याला अटक करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. त्यावर अनंत गर्जे हा स्वतःहून पोलिसांना शरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर, गौरी गर्जे यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका तिच्या माहेरच्या लोकांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर घरापासून काही अंतरावर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सासरे भगवान गर्जे यांनी विधी पार पाडला.
वातावरण तणावपूर्ण सासऱ्यांनी केला अंत्यविधी
सोमवारी (दि.२४) सकाळी गौरीचा मृतदेह मोहोज देवढे येथे आणण्यात आला. यावेळी माहेरकडील लोकांनी तिच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली.
सासरच्या लोकांनी त्यास विरोध केला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठा वाद, ढकलाढकली झाली. वातावरण तणावपूर्ण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून लोकांना शांत केले.
उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, पीएसआय महादेव गुट्टे, विलास जाधव, निवृत्ती आगरकर, लक्ष्मण पवार यांनी परिस्थिती सुरळीत केली. अखेर घरापासून काही अंतरावर गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गौरी गर्जे मृत्युप्रकरणी निष्पक्ष तपास व्हावा : चाकणकर
मुंबई : डॉ. गौरी गर्जे यांनी पती अनंत गर्जे यांच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, तपास प्रक्रिया कोणत्याही प्रकारे प्रभावित होऊ नये, अशा सूचना महिला आयोगातर्फे पोलिसांना देण्यात आल्या असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
श्रीमंताच्या नादी लागू नका, भपक्यावर जाऊ नका...
‘तुम्हाला मुली असतील, तर त्या गरिबाला द्या. श्रीमंतांच्या नादी लागू नका, त्यांच्या भपक्यावर जाऊ नका...’ असं म्हणत गौरीच्या वडिलांनी पोलिसांसमोरच न्यायासाठी हंबरडा फोडला. तुम्हाला मुली असतील, तर माझ्या मुलीला न्याय द्या, असेही ते म्हणाले.
अंजली दमानियांचे लक्ष
संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या व्हिडीओ कॉलवरून माहेरकडील नातेवाइकांशी संवाद साधत होत्या, तसेच पोलिसांकडून तेथील घटनांची माहिती घेत होत्या. गौरीच्या मृत्यूचे खरे कारण आत्महत्या की संशयास्पद हत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.