मुंबई - दादरमधील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या खर्चात वाढ होण्याची चिन्हे आहेत. पुतळ्याच्या कामासाठी लागणाऱ्या धातूचे दर दुप्पट झाल्याने प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधी देण्याची मागणी पुतळ्याचे काम करणाऱ्या राम सुतार फाईन आर्टस् कंपनीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२७ उजाडणार आहे.
स्मारकाच्या कामाला फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली. काम फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. एमएमआरडीएने या स्मारकाच्या कामासाठी नोव्हेंबर २०२६ ची मुदत दिली आहे. मात्र सद्यस्थितीत प्रकल्पाच्या पुतळ्याच्या कांस्य धातूची केवळ ११ टक्के कामे झाली आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीच्या पुतळ्याच्या कामासाठी एकूण ७ हजार टन धातू लागणार आहे. ब्राँझ धातूचे कास्टींग करण्यासाठी तो वितळवावा लागतो. यासाठी ४०० केजीचे ४ सिलिंडर रोज लागतात. मात्र, आखाती युद्धामुळे एलपीजी गॅसच्या व्यावसायिक वापरावर सरकारने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मूर्ती निर्मितीचे काम थांबले आहे, असेही सुतार म्हणाले.. दरम्यान, प्रकल्पाचा मूळ खर्च ७६३ कोटी रुपये होता. मात्र, विलंब आणि स्मारकाच्या कामात झालेला बदल यामुळे प्रकल्पाची किंमत वाढून १०८९ कोटी रुपयांवर गेली. आता अनिल सुतार यांनी धातूच्या किंमती वाढल्याने आणखी निधीची मागणी केल्याने प्रकल्पाचा खर्च वाढेल.
गेल्या काही काळात ब्राँझ धातूचे दर दुप्पट झाले आहेत. तसेच कारागिरांची मजुरीही वाढली आहे. परिणामी, आधीच्या दरात काम पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारला पत्र लिहून प्रकल्पाच्या कामासाठी आणखी निधी देण्याची मागणी केली आहे.- अनिल सुतार, उपाध्यक्ष, राम सुतार फाईन आर्टस्
कांस्य धातूचे तब्बल १०० टनाचे काम पूर्णडॉ. आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या कांस्य धातूच्या आवरणाच्या निर्मितीचे काम शिल्पकार राम सुतार यांच्या उत्तर प्रदेशातील कारखान्यात सुरू आहे. ही मूर्ती ८५० टन वजनाची असेल. त्यातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या दोन्ही बुटांचे पॅनेल कास्टिंग पूर्ण झाले असून, हे बूट प्रकल्पस्थळी आणले आहेत. तर दोन्ही पायांच्या पॅन्टचे कामही पूर्ण झाले असून, पुढील आठवड्यात हे भाग प्रकल्पस्थळी पाठवले जातील. सद्यस्थितीत मूर्तीचे कांस्य धातूचे ८५० टनपैकी १०० टन भागाचे काम पूर्ण झाले आहे. तर पुतळ्याच्या कांस्य धातूचे ११ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सुतार यांनी दिली.
Web Summary : Rising metal costs threaten Ambedkar memorial project in Mumbai. Ram Sutar Arts seeks additional funds from government to complete statue. Project, 55% done, faces delays until December 2027. Original cost ₹763 crore, now ₹1089 crore.
Web Summary : मुंबई में बन रहे आंबेडकर स्मारक की लागत बढ़ी। राम सुतार आर्ट्स ने मूर्ति पूरी करने के लिए सरकार से अतिरिक्त धन मांगा। परियोजना, 55% पूरी, दिसंबर 2027 तक विलंबित। मूल लागत ₹763 करोड़, अब ₹1089 करोड़ है।