"अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको"; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 02:09 PM2024-02-01T14:09:51+5:302024-02-01T14:10:53+5:30

आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे असा टोला ठाकरेंनी लगावला.

Does Uddhav Thackeray dream of becoming Prime Minister? Criticism of BJP in Raigad meeting | "अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको"; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले

"अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको"; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले

रायगड - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) आम्ही लढतोय, अनंत गीतेंनी माझी पंचाईत केली. उद्धव ठाकरेंच पुन्हा मुख्यमंत्री होणार. अहो मी, पंतप्रधानपदाचे स्वप्न बघू की नको असा प्रश्न पडलाय अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी सभेत मांडली तेव्हा लोकही हसले. रायगडच्या पेण येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत भाजपासह स्थानिक खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला अशी स्वप्न पडत नाहीत. ना मुख्यमंत्रिपदाचे पडले होते ना पंतप्रधानपदाचे स्वप्न स्वप्नातही पडत नाही. मला फक्त दिसतोय माझा देश, माझी भारतमाता आणि या भारतमातेच्या बाजूला असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, घटना ते आम्हाला वाचवायचं आहे. कोणालाही मतदान करायचं म्हणून मत द्यायचे नाही. हे मत तुम्ही स्वत: तुमच्या पुढच्या पिढीसाठी देणार आहात. पुढच्या पिढी भलेही तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचा तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या पिढीने जगावं अशी तुमची इच्छा असेल तर जरुर तुम्ही हुकुमशाहीला मतदान करा. नाहीतर इंडिया आघाडी जी देशभक्तांची आघाडी आहे तिला तुम्ही मतदान करा असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच  आज मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो, शेकाप आपल्या सोबत आहे. अनंत गीते यांचा गेल्यावेळी पराभव झाला. परंतु मी रायगडला धन्यवाद देतो, कारण त्यावेळीही रायगड मोदीलाटेत वाहून गेला नाही. आत निवडून आलेला मोदी  लाटेत गेला परंतु आमचा रायगड तिथेच आहे. आज रायगडकर खुश झालेत. आता तर आपण हुकुमशाहीविरोधात उभे राहिलो आहोत. रायगडमध्ये जास्त प्रचार करण्याचीही गरज भासणार नाही. गेल्यावेळी इतके करूनही रायगडकरांनी मोदींविरोधात मतदान केले होते. यावेळी तर मोदींविरोधात त्सुनामीने मतदान होणार आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी खासदार सुनील तटकरेंना टोला लगावला. 

दरम्यान, आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानतो, यापुढे आम्ही देशात चार जातींसाठी काम करणार, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी असं त्या बोलल्या. त्यांनी मोठे धाडस केले आहे. पंतप्रधानासमोर हे बोलण्याचे धाडस दाखवले म्हणून सीतारामन यांचं कौतुक आहे. निवडणुका आल्या म्हणून तुमच्या सूटबूटातील मित्रांव्यतिरिक्त देश आहे हे कळाले. गेल्या १० वर्षापासून या वर्गावर तुमचे लक्ष नव्हते. महिलांकडे लक्ष देता मग मणिपूरमध्ये का जात नाही. निवडणुकीत महिलांची मते हवीत म्हणून आता महिलांसाठी काम करतो हे बोलले जाते. उत्तरेकडील शेतकऱ्यांनी थंडी, ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता सहा महिने आंदोलन केले. तेव्हा तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवलं आणि आता निवडणूक आल्यावर ते शेतकरी झाले. या सर्व भूलथापा आणि थोतांड आहे. अजूनही जादूचे प्रयोग होत असतील. पण पाहिले नसतील तर दिल्लीत अजून जादूचे प्रयोग सुरू आहेत. अर्थसंकल्प म्हणजे जनतेला टोपी घालण्याचा प्रकार आहे. मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किंमती दुपटीने वाढवतील. गेल्या १० वर्षात तरुणांना नोकरी का दिली नाही. १० वर्ष तुम्ही काय केले? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर केली.

Web Title: Does Uddhav Thackeray dream of becoming Prime Minister? Criticism of BJP in Raigad meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.