मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 05:55 IST2025-09-13T05:53:13+5:302025-09-13T05:55:46+5:30

आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का ? की केवळ ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे, त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

Does the Maratha community not want the reservation it already got? Should it be cancelled?; OBC leader Chhagan Bhujbal questions | मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल

मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल

नाशिक : मराठा समाजासाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षण आधीच दिलेले आहे, तसेच ईडब्ल्यूएसच्या आरक्षणातील १० टक्क्यांपैकी ८० टक्के वाटा मराठा समाजालाच मिळतो, त्याशिवाय ओपनमधील ५० टक्क्यांतील बहुतांश वाटा मराठा समाजाला मिळत असताना ही सर्व आरक्षणे तुम्हाला नको आहेत का ? आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का ? की केवळ ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे, त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे. तेदेखील ज्यांना आरक्षण म्हणजे काय ? हे समजते अशा सुशिक्षित नेतृत्वानेच द्यावे, असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी जरांगे यांना लगावला. 

येथे पत्रकारांशी संवाद करताना भुजबळ बोलत होते. मराठा समाजात अनेक माजी मुख्यमंत्री, अनेक आजी-माजी केंद्रीय मंत्री, राज्यातील विद्यमान मंत्री, खासदार, आमदार असे बरेच जण सुशिक्षित आणि समाजाशी नाळ जोडलेले नेते असल्याने त्यांच्यापैकी कुणीही यावर बोलावे. जे शिकलेले आहेत, त्यांनीच उत्तर द्यावे, समजत नाही, अशिक्षित आहे त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा नसल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. 

देशातील वरिष्ठ जातींमधून विविध राज्यांमध्ये आंदोलने झाल्यानंतर त्यांना मोदी सरकारने १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर ती आंदोलने शांत झाली. 

ओबीसीतच हिस्सा कशासाठी? 

राजकीय आरक्षणामध्ये गाव, खेडे पातळीवर सरपंच पद ओबीसींसह अन्य मागास समाजाला मिळते. तरीदेखील ते कुणाला द्यायचे हे ठरविण्याचे काम हे तेथील स्थानिक मराठा समाजाचे नेतृत्वच करीत असते, हे वास्तव आजही कायम आहे. तरीदेखील ओबीसीतच आरक्षणाचा हिस्सा कशासाठी हवा आहे ? याबाबत मराठा समाजातील जाणकार, अनुभवी आणि सुशिक्षित नेत्यांनी जाहीरपणे बोलावे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

मराठा समाजालाच विविध लाभ 

महाराष्ट्रात मात्र मराठ्यांना त्या १० टक्क्यांशिवायही अन्य लाभ मिळत आहेत. ब्राह्मण समाज अवघा दोन, तीन टक्के असल्याने ईडब्ल्यूएसमध्ये लाभ घेण्याचे त्याचे प्रमाणही अत्यल्प असून त्या १० टक्क्यांतही सर्वाधिक लाभ हा मराठा समाजाला मिळत आहे. सर्व शैक्षणिक प्रवेशांतूनही ही आकडेवारी सहजपणे दिसून येत असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.

कराड कुटुंबीयांचे केले सांत्वन

लातूर : रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या तरुणाने आता ओबीसी आरक्षण संपणार या भीतीपोटी बुधवारी आत्महत्या केली. 

त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शुक्रवारी गावात आले होते. जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत तुम्ही असले आत्महत्येचे मार्ग अवलंबू नका. राज्यात ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आपण सर्व जण एकजुटीने संघर्ष करू, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

‘शिवा’ संघटनेविरुद्ध मराठा पालक

अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणास विरोध करत  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या टीसी काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केला आहे.

‘अशिक्षित असलो तरी भुजबळांना रडकुंडीला आणले, आरक्षण मिळवले’

वडीगोद्री (जि. जालना) : मी जरी अशिक्षित असलो तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, या तुमच्या विचारांवर पाणी फेरत रडकुंडीला आणले, असा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला. 

जरांगे पाटील यांनी शुक्रवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना चांगलाच माहीत आहे की मी अशिक्षित आहे की सुशिक्षित आहे. मी जीआर काढला तरी त्याला काहीच सुधरत नाही. मी अशिक्षित असताना ते टेन्शनमध्ये आले जर सुशिक्षित लोक बोलायला लागले तर त्याचं काय होईल विचार करा, असे म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला.

सातारा गॅझेटबाबत पावले उचलण्यास सुरुवात

पुणे : मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल देण्याच्या सूचना आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष  राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विभागीय आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार समितीचे सदस्य आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतच्या कार्यवाहीची माहिती घेतली. 

Web Title: Does the Maratha community not want the reservation it already got? Should it be cancelled?; OBC leader Chhagan Bhujbal questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.