"तुमचे जुगारात जसे पैसे संपले तशी काँग्रेस संपणार नाही"; वर्षा गायकवाड यांचा बावनकुळेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:01 IST2025-05-05T15:50:58+5:302025-05-05T16:01:13+5:30
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या विधानावरुन वर्षा गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"तुमचे जुगारात जसे पैसे संपले तशी काँग्रेस संपणार नाही"; वर्षा गायकवाड यांचा बावनकुळेंवर पलटवार
Varsha Gaikwad on Chandrashekhar Bawankule: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा, असे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा फायदा होईल असं विधान बावनकुळे यांनी केलं. त्यानंतर आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे.
पुण्यात झालेल्या पदाधिकारी बैठकीत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केल्याचे म्हटलं जात आहे. संग्राम थोपटे यांच्यासारखे जे कोणी दिसतील त्यांना पक्षात घेऊन या. तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा फायदा आहे. माझं काय होईल याची काळजी अजिबात करू नका, देवेंद्रजी आहेत, मी आहे, मुरलीधर मोहोळ आहेत, अमित शाह आहेत. आम्ही तुम्हाला न्याय देणार की त्यांना देणार, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्यावरुनच काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निशाणा साधला.
"ते हाँगकाँगला गेले होते. तिथे जसे तीन कोटी रुपये त्वरित संपले, तशी काँग्रेस संपण्याची गोष्ट करु नये. तो जुगाराचा खेळ होता. इथे लोक काँग्रेससोबत विचारधारेने जमले आहेत. लोकांची काँग्रेसप्रती श्रद्धा आणि निष्ठा आहे. असे बोलणारे खूप आलेत. आधी स्वतःचा पक्ष सांभाळा," असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
"काँग्रेस पक्षाला संपवण्याची भाषा करणारे खूप लोक येऊन गेले. काँग्रेस हा जनमानसातला विचार आहे. १३५ वर्ष जुना पक्ष आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आता समजून घेतलं पाहिजे की एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असं बोलतो. राजकारण एवढं घाणेरड्या पातळीला करण्याचा प्रकार झाला आहे. हा प्रकार भाजपने सुरू केला आहे. मंत्रिमंडळात त्यांचे आमदार बघा, अधिकाधिक लोक हे बाहेरून आलेले आहेत. सगळे उपरे आहेत. स्वतःच्या कार्यकर्त्याला कुठे त्यांनी संधी दिली?," असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.