२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:23 IST2025-10-02T15:22:35+5:302025-10-02T15:23:00+5:30
जातीवादाचे राक्षस आहेत, धर्मवादाचे राक्षस आहेत. जातीपातीच्या भिंती निर्माण झाल्यात त्या दूर करण्यासाठी आईने आम्हाला शक्ती द्यावी असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
बीड - २ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका, कुणाचे पैसे घेऊ नका, खोटे धंदे करू नका असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी जनतेला केले. बीड येथील दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, चांगल्या माणसाचे चांगलेच होते, भगवान बाबांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतात. मला तुमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. मी तुमच्यासमोर नतमस्तक झाले त्याचा अभिमान आहे. दरवर्षी राज्यातून मोठ्या संख्येने लोक मेळाव्याला येतात. आपला दसरा फक्त मेळावा नाही. अत्यंत संघर्षाने उभ्या राहिलेल्या साध्या भोळ्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे. नदीला पूर आला असताना, गावागावात पाणी शिरले असताना लोकांची घरे, संसार वाहून गेले असताना तुम्ही इतक्या उन्हात इथं आला. सोन्यासारखी माणसं इथं सोनं लुटण्यासाठी आलेत. एक एक माणूस सोन्याचं खणखणणारं नाणे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आजच्या कलयुगात रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आला आहे. हा राक्षस शरीरात नाही तर चुकीच्या निर्णयातून, चुकीच्या धोरणातून, चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात. जातीवादाचे राक्षस आहेत, धर्मवादाचे राक्षस आहेत. जातीपातीच्या भिंती निर्माण झाल्यात त्या दूर करण्यासाठी आईने आम्हाला शक्ती द्यावी. पूराच्या संकटात जातपात सोडून एकमेकांच्या मदतीला लोक धावले हे पाहून आनंद झाला. भविष्यात जातीजाती एकत्रित करण्याचा धागा आपल्याला बनायचे आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं. तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे. मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती करतो असं सांगत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट केली.