पुणे : आपण विधानसभेत आमदारांना फारसे बोलू देत नाही. कारण सभागृहात बोलायला उभे राहिले तर माध्यमांमध्ये छायाचित्र छापून येते, असे आमदारांना वाटते, अशी मिस्कील टिप्पणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे काम हे बोलण्याचे नाही तर मंत्रालयात जाऊन आपल्या मंत्र्याकडून काम करून घेण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले.स्व. प्रमोद महाजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मुक्तछंदतर्फे आयोजित ‘स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. या वेळी दहशतवादविरोधी यंत्रणेचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, जर्मनीतील ‘क्रॉस आॅर्डर आॅफ मेरिट’ पुरस्कार पटकावणारे डॉ. अरविंद नातू, किल्लारी भूकंपातून बचावलेली प्रिया जवळगे, बचाव पथकप्रमुख लेफ्टनंट कर्नल सुमीत बक्षी, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांना स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.बागडे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह त्या काळात प्रमोद महाजन यांच्या भाषणांचेही तितकेच आकर्षण असायचे. १९८५ मध्ये शिवसेना- भाजप युती करण्यासाठी महाजन यांनी जिल्हावार दौरा केला आणि शेवटी युती यशस्वी करून दाखविली. कितीही तणाव आले तरी त्यातून मार्ग काढायचा ही त्यांची वृत्ती होती. आज महाजन असते तर राजकारणाला चांगली दिशा मिळाली असती. गिरीश बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमोद महाजन यांच्या विचारांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, ‘पोलीस सेवेत असल्याने पुरस्कार स्वीकारण्याची परवानगी घ्यावी लागते. मेधा कुलकर्णी यांनी ती एका दिवसात मिळवली. रोख रकमेशिवाय पुरस्कार स्वीकारा, असे पत्र मला वरिष्ठांकडून मिळाले. तसंही मी माझ्या आयुष्यात पगार सोडून ‘रोख रक्कम’ कधीच स्वीकारली नाही.’बक्षी म्हणाले, की समाजोपयोगी संशोधन ही गरज आहे. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेसाठी संशोधन महत्त्वाचे असून, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण व्यवस्थेची गरज असल्याचे मत अरविंद नातू यांनी व्यक्त केले. मानवता हा धर्म सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे. माणुसकीच्या नात्याने कर्म केले पाहिजे.
...म्हणून आमदारांना बोलू देत नाही; हरिभाऊ बागडे यांची मिस्कील टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 03:20 IST