अवास्तव स्वप्न पाहताना वास्तवात गोंधळ घालू नका : नागराज मंजुळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 12:57 PM2019-11-06T12:57:37+5:302019-11-06T13:00:31+5:30

आजकाल गावागावांमधून ‘ऑडिशन्स’ होतात. प्रत्येकालाच आपण अभिनेता-अभिनेत्री व्हावं असं वाटतं...

Do not confuse reality with dreaming: Nagraj Manjule | अवास्तव स्वप्न पाहताना वास्तवात गोंधळ घालू नका : नागराज मंजुळे 

अवास्तव स्वप्न पाहताना वास्तवात गोंधळ घालू नका : नागराज मंजुळे 

Next
ठळक मुद्देमराठी रंगभूमीदिनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार प्रदान 

पुणे : आजकाल गावागावांमधून ‘ऑडिशन्स’ होतात. प्रत्येकालाच आपण अभिनेता-अभिनेत्री व्हावं असं वाटतं. सध्या काय तर, सोशल मीडियावरही ‘टिकटॉक’चे  फॅड निघाले आहे, अशी मिश्कील टिप्पणी करीत आपल्यामध्ये नक्की अभिनयाचे गुण आहेत की नाही, याची सर्वप्रथम पडताळणी करा. उगाच अवास्तव स्वप्नं पाहून वास्तवात गोंधळ घालू नका, असा सल्ला प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नवोदितांना दिला.
 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या वतीने मराठी रंगभूमीदिनी ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते कै. जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते.
याशिवाय कलावती भडाळे यांना ‘माता जानकी पुरस्कार’, आशा तारे यांना ‘प्रपंच लक्ष्मी पुरस्कार’, प्रकाश पारखी आणि रवींद्र कुलकर्णी यांना ‘कै. चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार’ तर वर्षा आणि पराग चौधरी यांना ‘लक्ष्मीनारायण दाम्पत्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. 
याप्रसंगी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, ज्योती चांदेकर, रजनी भट, उपाध्यक्ष शेखर लोहकरे, विजय पटवर्धन, प्रमुख कार्यवाह विनोद खेडकर आणि कोषाध्यक्ष अशोक जाधव उपस्थित होते.
प्रास्ताविकात मेघराज राजेभोसले यांनी ‘सैराट’ नंतर प्रत्येकाला अभिनेता व्हावं असं वाटायला लागलं आहे. अनेक बोगस दिग्दर्शक तयार झाले. त्यामुळे ऑडिशन्सच्या नावाने फसवणुकीचे प्रकार वाढले. अखेर चित्रपट महामंडळाची परवानगी घेतल्याशिवाय ऑडिशन्स करता घेता येणार नाही, असे परिपत्रक जाहीर करावे लागल्याचे सांगितले. तोच धागा पकडत नागराज मंजुळे यांनीदेखील प्रत्येकालाच आता अभिनेता-अभिनेत्री व्हावं असं वाटू लागलं आहे. मात्र, आपल्याला नक्की अभिनय येतो का? याची चाचपणी जाणकारांकडून करून घ्या, असे स्पष्ट केले. 
माझा नाटकाशी संबंध आला तो केवळ शाळेपुरताच. शाळेत शिक्षकच नाटक बसवायचे आणि तेच तरुणांच्या भूमिका करायचे. मग मीच आपल्या भूमिका आपण करायला हव्यात, असे म्हणून सह्यांची मोहीम राबविली. मग आम्हाला  पडद्यामागून संवाद सांगण्याचे काम मिळाले, अशी आठवण नागराज मंजुळे यांनी सांगितली. नाटके खूप कमी बघितली जो काही संबंध आला तो वाचनातून, अशी कबुलीही त्यांनी दिली. पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘रंगला लोकरंग’ हा कार्यक्रम सुंदरपणे गुंफण्यात आला होता. लावणी, गवळण, बतावणी याचा आस्वाद रसिकांनी घेतला. मोनिका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
............
सत्काराला उत्तर देताना आज रंगभूमीदिनी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे  हा पुरस्कार दिला याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याची भावना भारती गोसावी यांनी व्यक्त केली. चित्रपटात काम न केल्याच दु:ख वाटतं. कारण चित्रपटातून झटपट प्रसिद्धी मिळते. इतकी वर्षे रंगभूमीवर काम करूनही तुम्ही काय करता? असं विचारलं जातं ते ऐकून चित्रपटात का काम केलं नाही, याचा पश्चाताप होतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Do not confuse reality with dreaming: Nagraj Manjule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.