‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:52 IST2025-10-06T14:47:14+5:302025-10-06T14:52:03+5:30
Anandacha Shidha Yojana News: महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नसल्याचे म्हटले जात आहे.

‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
Anandacha Shidha Yojana News: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता. या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. परंतु, राज्याच्या आर्थिक चणचणीमुळे या योजनेसाठी निधीच नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि पूरस्थितीने राज्यात प्रचंड मोठे नुकसान झाले असताना शेतकरी तसेच गरिबांची दिवाळी फराळाविनाच जाईल, असे चित्र असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने ६० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. लाखो शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे दिवाळीत तरी दिलासा देण्याबाबत आनंदाचा शिधा योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु, दिवाळी दोन आठवड्यांवर आलेली असताना शासकीय पातळीवर याबाबत कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही. तसेच इतक्या कमी कालावधीत आनंदाचा शिधावाटप करणे अवघड असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.
आनंदाचा शिधा योजना कायमची बंद होण्याची चिन्हे
राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी 'आनंदाचा शिधा' योजना सुरू केली होती. परंतु, राज्याच्या सध्याच्या आर्थिक चणचणीमुळे ही योजना आता कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे म्हटले जात असून, ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे असल्याचे सूत्रांकडून समजते.
यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा गोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली. यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, एकनाथ शिदे यांच्या सरकारने नेतृत्वाखालील शिव जयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेच आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या उत्सवांच्या काळात सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा दिला होता. मात्र विधानसभा निवडणूक होऊन महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नसल्याचे समजते.