दिवाळीची पहाट त्यांच्यासाठी ठरली मरणाची वाट, मृतदेहांचा खच आणि नातेवाईकांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 04:20 PM2017-10-22T16:20:50+5:302017-10-22T16:21:28+5:30

मोलमजुरी करणारी कानडी कुटुंबे सणासुदीसाठी गावी गेली होती. दिवाळीची सुटी संपवून पुन्हा पोटासाठी परतणा-या या कुटुंबांसाठी दिवाळीची पहाट मरणाच्या वाटेवर नेणारी ठरली...

Diwali dawn is for them, waiting for death, cost of dead bodies and resentment of relatives | दिवाळीची पहाट त्यांच्यासाठी ठरली मरणाची वाट, मृतदेहांचा खच आणि नातेवाईकांचा आक्रोश

दिवाळीची पहाट त्यांच्यासाठी ठरली मरणाची वाट, मृतदेहांचा खच आणि नातेवाईकांचा आक्रोश

- दत्ता पाटील  
तासगाव - दारिद्र्य पाचवीलाच पूजलेले... परिणामी पोटासाठी भटकंती... याच भटकंतीतून गाव, राज्य, भाषा, प्रांत सोडून कर्नाटकातून महाराष्ट्रातील कराड, सातारा परिसरात स्थायिक होऊन, मोलमजुरी करणारी कानडी कुटुंबे सणासुदीसाठी गावी गेली होती. दिवाळीची सुटी संपवून पुन्हा पोटासाठी परतणा-या या कुटुंबांसाठी दिवाळीची पहाट मरणाच्या वाटेवर नेणारी ठरली. मणेराजुरी (ता. तासगाव) येथे योगेवाडी रस्त्यावरील घटनास्थळी फरशीच्या थप्पीखाली मृतदेहांचा ढिगारा आणि रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज हेलावून टाकत होता.
कर्नाटकातून महाराष्ट्रात कराड, सातारा परिसरात वीटभट्टी कामगार, वेठबिगार म्हणून काम करण्यासाठी अनेक कुटुुंबे स्थायिक झालेली आहेत. दिवाळीसाठी काही कुटुंबे गावाकडे गेलेली. सुटी संपल्यानंतर पुन्हा कामावर परतण्याचा नाईलाज. काहींचे नातेवाईक कराड परिसरात असल्याने त्यांना भेटण्यासाठी जाण्याची ओढ. महाराष्ट्रात संपामुळे एसटी बस बंद असल्यामुळे मिळेल त्या वाहनातून प्रवास करण्याची वेळ आलेली. शुक्रवारी रात्री अशा तीसजणांना फरशी वाहतूक करणाºया ट्रकचा आसरा मिळाला. दिवाळीच्या पाडव्याचा दिवस संपून भाऊबिजेची पहाट सुरू झालेली.
फरशीने भरलेल्या ट्रकमध्ये जागा मिळेल तसे दाटीवाटीने तब्बल तीस प्रवासी बसलेले. दोन कुटुंबे सोडली तर ट्रकमध्ये बसलेल्यांची एकमेकांशी ओळख ना पाळख. एक रात्र ट्रकमधून प्रवास करायचा, इतकाच काय तो एकमेकांशी संबंध. आठ ते दहाजण चालकाशेजारी केबीनमध्ये बसलेले, तर ट्रकमध्ये दोन्ही बाजूला फरशीने भरलेल्या ढिगाºयात दहाजण बसलेले. पुन्हा जागा नाही म्हणून आठ ते दहाजण चालकाच्या केबीनवर बसून प्रवासाला लागले. पहाटे तीनच्या सुमारास मणेराजुरीजवळ ट्रक आला.
रस्त्यावर हातभर अंतरावरील दिसणार नाही, इतके दाट धुके होते. याच धुक्यातून ट्रकचालक वाट काढत असताना, मोठ्या वळणावर त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक चारही चाके वरच्या दिशेला करून रस्त्याकडेच्या चरीमध्ये उलटला. केबीनमधील लोक जखमी झाले. केबीनच्या छतावर बसलेले लोक बाजूला फेकले गेले. काहीजण गंभीर जखमी झाले. मात्र फरशीने भरलेल्या ट्रकच्या हौद्यात मधोमध दहा प्रवासी पहाटेच्या झोपेत होते. या झोपेतच अपघात घडला. काय घडले हे समजण्याआधीच फरशीच्या ढिगाºयात हे सर्वजण गाडले गेले आणि याच ढिगाºयावर ट्रक उलटला होता! सणातल्या आनंदाचे काही क्षण अनुभवून परतीच्या वाटेवरचा हा मजुरांचा प्रवास आयुष्याच्याच परतीचा ठरल्याने हा प्रसंग प्रत्येकाच्या हृदयात कालवाकालव करून गेला.
प्रशासनाची संवेदनशील तत्परता
भीषण अपघाताची माहिती मिळाताच, पोलिस निरीक्षकांसह सर्व पोलिस खाते, महसूल यंत्रणेतील उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिष्ठातांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली होती. प्रशासनाच्या तत्परतेमुळे जखमींना तातडीने मदत मिळाली. काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय लोकप्रतिनिंधींमुळे मृत आणि जखमींना त्यांच्या गावाकडे नेण्यासाठी रुग्णवाहिकेची, शववाहिकेची सोय झाली.

Web Title: Diwali dawn is for them, waiting for death, cost of dead bodies and resentment of relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.