CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:35 IST2025-01-21T15:34:37+5:302025-01-21T15:35:18+5:30

आदिती तटकरेंनी मंत्री असताना रायगडमध्ये ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी स्वतः फिल्डवर राहून लोकांची सेवा केली.

Dispute between Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP over the post of guardian minister of Raigad, Sunil Tatkare, Aditi Tatkare, attempt to put CM Devendra Fadnavis in trouble, NCP alleges | CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा

CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा

मुंबई - रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून झालेल्या वादामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. त्यात शिंदेसेनेच्या आमदारांकडून सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर टीका सुरू आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु नये, तसं झाले तर ती टिका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी या वादातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

आनंद परांजपे म्हणाले की, राज्यातील ३६ जिल्हयातील पालकमंत्री पदाचा शासननिर्णय घोषित झाला मात्र रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्हयाच्या पालकमंत्री निवडीवर महायुतीतील घटकपक्ष शिवसेना यांनी नाराजी व्यक्त केली. रायगड येथे ज्यापद्धतीने  मुंबई - गोवा महामार्ग अडवून आणि टायर जाळून जो असंसदीय निषेध आंदोलन केले हा प्रयोग योग्य नव्हता. आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे व तटकरे कुटुंबीय यांच्याबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती अशोभनीय, निंदनीय, निषेधार्ह आहेच शिवाय महायुतीच्या धर्माला गालबोट लावणारे आहे. लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपले म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. एखादा निर्णय पटला नाही तर पक्षातील पक्षप्रमुखाकडे म्हणणे मांडायचे असते. पालकमंत्री पदाचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे अशाप्रकारे वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत नाहीय ना अशी शंका त्यांनी उपस्थित केली. 

तसेच पालकमंत्री पदाचा जो काही निर्णय झाला त्यानंतर रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. ज्यावेळी मुख्यमंत्री दावोस येथून परततील तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याशी संवाद साधतील. परंतु ज्यांना आपण आराध्य दैवत समजतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील रायगड राजधानीतील महाड येथे असा प्रकार घडतो याबद्दल दु:ख आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी मातांचा, भगिनींचा मानसन्मान कसा ठेवला याची आठवणही आनंद परांजपे यांनी करुन दिली. आदिती तटकरे यांच्याबद्दल ज्यापध्दतीने वक्तव्य करण्यात आली, या भगिनीने आपले कर्तृत्व केवळ मंत्री म्हणून नाही तर जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या त्यावेळी आपल्या कामातून कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मंत्री असताना रायगडमध्ये ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी स्वतः फिल्डवर राहून लोकांची सेवा केली. महाविकास आघाडीत चांगले काम केलेच शिवाय महायुतीत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यावेळी दरमहा १५०० रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात जमा केले. एखादी घोषणा जाहीर झाल्यावर ती कार्यान्वित करणे आणि यशस्वी करणे यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावे लागतात. ते परिश्रम अदिती तटकरे यांनी घेतले. राज्यातील २ कोटी ३५ लाख महिलांच्या खात्यात ती रक्कम जमा झाली आणि महायुतीला जे अभूतपूर्व यश विधानसभेत मिळाले त्यात मोठे योगदान मंत्री म्हणून अदिती तटकरे यांचे आहे असं आनंद परांजपे यांनी सांगितले. 

दरम्यान, गेले दोन दिवस सातत्याने अशोभनीय गोष्टी रायगड जिल्हयात घडत आहेत त्या निषेधार्ह आहेत. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री पदाचे आपले म्हणणे त्यांचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडायला हवे होते किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडायला हवे होते. परंतु तसे न करता आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका सुरू केली आहे ती कदापि खपवून घेतली जाणार नाही. भरत गोगावले आपण एका संविधानिक पदावर असताना रास्ता रोको करणे, टायर जाळणे एका अर्थाने ज्या मुख्यमंत्र्यांकडे कायदा व सुव्यवस्थेचे गृहखाते आहे ते बिघडवण्याचे काम संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने करु नये असा खोचक टोलाही परांजपे यांनी लगावला. 

Web Title: Dispute between Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP over the post of guardian minister of Raigad, Sunil Tatkare, Aditi Tatkare, attempt to put CM Devendra Fadnavis in trouble, NCP alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.