कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणार - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 17:36 IST2024-01-10T17:35:39+5:302024-01-10T17:36:15+5:30
नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभे करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले.

कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणार - धनंजय मुंडे
मुंबई : निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबत नाशिक जिल्ह्यातील माजी विधान परिषद सदस्य जयंतराव जाधव यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीचे मागणी केली होती त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते तसेच कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते काही वेळा शेतकरी कांदा फेकून देतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीकडून डीहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी जयंतराव जाधव यांनी शासनाकडे केली होती.
हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व्यापक जनहिताचा असल्यामुळे या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून 60 टक्के ऐवजी 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच नाशिक जिल्ह्यात पिकणाऱ्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात निर्यात होते मात्र फूड टेस्टिंग लॅबोरेटरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना निर्यातीच्या अटींची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभे करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले.