'नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल', कृष्णा आंधळेबद्दल पवारांच्या आमदाराने उपस्थित केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:27 IST2025-01-28T13:23:15+5:302025-01-28T13:27:26+5:30
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता आहे. त्याबद्दल शंका उपस्थित करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल, असे म्हटले आहे.

'नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल', कृष्णा आंधळेबद्दल पवारांच्या आमदाराने उपस्थित केली शंका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता आहे. कृष्णा आंधळेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शंका व्यक्त केली आहे. जेव्हा विषय त्यांच्या अंगलट येतो, तेव्हा तो माणूस कधीच सापडत नाही, असे सूचक विधान आमदार क्षीरसागर यांनी केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, "मला वाटतं नाही की, जो व्यक्ती राहिला आहे, तो सापडणार नाही. आपण त्या भागातील सुरूवातीची समिकरणे बघतो. जेव्हा एखादा विषय त्यांच्या अंगलट येतो, तो माणूस कधीच सापडत नाही, असं दिसतं. मला वाटत नाही हा माणूस सापडेल. जे काही झालं असेल त्याच्यासोबत", असे म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरोपी कृष्णा आंधळेबद्दल शंका व्यक्त केली.
वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट
"मी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. चुकीची गोष्ट झाली, तर ती अजित पवारांना पटत नाही. आमदारांनी विधानसभेत मुद्दा मांडल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलले. पोलीस अधीक्षकांची बदली झाली. आणि जी काही कारवाई तिथे होतेय. पण, मास्टरमाईंड वाल्मीक कराडचा मुद्दा आला की, त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते", असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.
धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल -संदीप क्षीरसागर
संदीप क्षीरसागर म्हणाले, "२८ तारखेला मी सभागृहात बोललो होतो की, मास्टरमाईंडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यातील लोक मोर्चा काढणार. एका लाखापेक्षा जास्त लोक तिथे जमली होती. माझं अजून एक म्हणणं आहे की, हा गुन्हा दाखल करण्यात १०-१२ तास उशीर झाला. या १०-१२ तासात तिथले पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना कोणी फोन केले आणि गुन्हा दाखल करण्यास उशीर केला, हे सीडीआर रिपोर्टमधून कळणार आहे. ही सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल", असे विधान संदीप क्षीरसागर यांनी केले.
धनंजय मुंडे काय बोलले?
"आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहिती असेल. आणखी कुणा कुणाला काही माहिती असेल, याचा अर्थ मी असा समजतो की, त्यांचे आणि त्या आरोपीचे आता कुठेतरी संबंध आहेत. हे संबंध असल्याशिवाय त्यांना ही माहिती मिळू कशी शकते? त्या कृष्णाला काय झालं, याची पोलिसांना माहिती नाही. तुम्हा-आम्हाला माहिती नाही. तर त्याला (संदीप क्षीरसागर) कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीने बातम्या पेरायच्या. आपल्याला ती बातमी मिळते", असे उत्तर धनंजय मुंडेंनी दिले.