धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा व्हायला पाहिजे होता; पंकजा मुंडेंची आली प्रतिक्रिया, देशमुख कुटुंबाची मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:20 IST2025-03-04T13:19:24+5:302025-03-04T13:20:09+5:30
Pankaja Munde on Dhananjay Munde resign: काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी देशमुख प्रकरणावर विचारले असता पंकजा यांनी पुण्याच्या दौऱ्यावर असल्याने पुण्याबाबत विचारा, असे सांगत विषय टाळला होता.

धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा व्हायला पाहिजे होता; पंकजा मुंडेंची आली प्रतिक्रिया, देशमुख कुटुंबाची मागितली माफी
चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आली आहे. काल काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे ते व्हिडिओ होते. ते व्हिडिओ उघडून पाहण्याची सुद्धा माझी हिम्मत झाली नाही. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत आहे. पण हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनामा घेणाऱ्यांनी सुद्धा आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. एकप्रकारे पंकजा यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ बनविला आहे. हे व्हिडिओ बघण्याची सुद्धा माझी हिम्मत झाली नाही. या हत्येमध्ये कोण इनवॉल आहे? कोणाकोणाचा हात आहे? हे फक्त तपास यंत्रणांना माहीत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, त्यात मी माझी भूमिका मांडली होती. यामुळे मी यात हस्तक्षेप करण्याचा काही संबंध नाही. ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे, त्या मुलांमुळे संपूर्ण राज्यातील समाज ज्यांचा कुठलाही दोष नाही, त्यांची बदनामी झाली आहे. संतोष देशमुख यांचा समाज सुद्धा आक्रोशात वावरत आहे. आपल्या राज्यात कुठलीही गोष्ट जातीवर जाते. अमानुषपणे एखाद्याला संपवणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या लोकांना कुठलीही जात नसते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
गुन्हेगारांना जशी कुठली जात नसते तशीच राजकारण्यांना सुद्धा कुठली जात नसते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी आमदारकीची शपथ घेतली, तेव्हाच कोणाबद्दल आक्रोश बाळगणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे याही प्रकरणात कुठलाही जातीवाद होण्याचा प्रयत्न होऊ नये. मी संतोष देशमुख यांच्या आईची आणि कुटुंबीयांची हात जोडून माफी मागते, असे आज पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पुण्यात बोलण्यास नकार, नागपूरमध्ये बोलल्या...
काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी देशमुख प्रकरणावर विचारले असता पंकजा यांनी पुण्याच्या दौऱ्यावर असल्याने पुण्याबाबत विचारा, असे सांगत विषय टाळला होता. तसेच संतोष देशमुख भाजपचेच होते, तरीही पंकजा या त्यांच्या घरी सांत्वनासाठी अद्यापपर्यंत गेल्या नाहीत. यावरूनही त्यांच्यावर विरोधक टीका करत होते. भाजपचेच आमदार सुरेश धस यांनीही टीका केली होती. आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यावर पंकजा मुंडे यांनी नागपूरमध्ये असूनही यावर बोलल्या आहेत.