धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रिपदाची गळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:51 IST2025-08-12T11:49:51+5:302025-08-12T11:51:21+5:30
Dhananjay Munde News: संघर्षाच्या गोष्टींमागे विकास आणि कौतुकाच्या माळेच्या बहाण्याने मंत्रिपदाचा अर्जच धनंजय मुंडे यांनी दिल्याची चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रिपदाची गळ?
Dhananjay Munde News: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला सत्तेशी संघर्ष करायला शिकविले. समझोता केल्यानंतर नेतृत्व मोठे होत नाही, ही त्यांची शिकवण आमच्यात कायम आहे. हातातला कोरा कागद जरी त्यांनी पुरावा म्हणून दाखविला, तर त्यावर सभागृहाचा विश्वास असायचा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भर सभेत कौतुक केले.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सामील असलेल्या वाल्मीक कराड याच्याशी धनंजय मुंडे यांचा घनिष्ट संबंध असल्याचा आरोप करत विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. विरोधकांच्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर अनेक दिवस धनंजय मुंडे सक्रीय नव्हते. अलीकडेच ते पुन्हा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. यातच राजीनामा देऊनही धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला सोडला नसल्याचे समोर आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतण्यावरून सूतोवाच केले. यानंतर आता खुद्द धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भर सभेत तोंडभरून कौतुक केल्याने मंत्रिपदासाठी गळ घालण्याचा हा प्रयत्न होता का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
'संघर्ष' की मंत्रिपदाची गळ?
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी भाषणाची सुरुवातच 'संघर्ष पाचवीला पूजलेला' अशा ओळींनी केली. पुढे तोच सूर आळवत त्यांनी परळीच्या विकासाची मागणी केली. गोपीनाथ मुंडेंचा वारसा, संघर्ष यांचा उल्लेख करत त्यांनी फडणवीसांची स्तुती केली. एकदा नाही, तीनदा मुख्यमंत्री झालेत, हे खास अधोरेखित केलं. खुद्द धनंजय तीन वेळा मंत्री होते. त्यांच्या भगिनी पंकजाही मंत्री आहेत असे असतानाही त्यांनी 'परळी'चा नकाशा फडणवीसांच्या टेबलावर ठेवला. एकूणच, संघर्षाच्या गोष्टींमागे विकास आणि कौतुकाच्या माळेतून मतदारसंघाच्या हक्काची मागणी होती का? शिवाय अनावरणाच्या बहाण्याने मंत्रिपदाचा अर्जच दिल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मुघलांना झोपेतही संताजी, धनाजी दिसायचे. त्याचप्रमाणे विधानसभेत गोपीनाथ मुंडे कोणता प्रश्न मांडणार, याची तत्कालीन सत्ताधाऱ्यांना धडकी भरायची. त्यांच्या संघर्षामुळेच भाजप सर्वात मोठा पक्ष झाला. सत्तेशी संघर्ष करण्याची शिकवण त्यांनीच आम्हाला दिली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत अभिवादन केले. गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांना 'सळो की पळो' करून सोडले. अंडरवर्ल्डच्या विळख्यातून महाराष्ट्राला त्यांनी बाहेर काढले. गोपीनाथ मुंडे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडले. मुंडे यांना दिल्लीतून महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आणणारच होतो. परंतु, दुर्दैवाने ते होऊ शकले नाही, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.