देवेंद्र फडणवीस यांचा कारभार नाना फडणवीस यांच्यासारखा : राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 20:09 IST2018-09-08T20:05:36+5:302018-09-08T20:09:55+5:30
देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा पेशव्यांच्या नाना फडणवीस यांच्या सारखा आहे. पुढे येऊन काही बोलत नाहीत पण मागून पाठबळ देण्याचं काम ते करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांचा कारभार नाना फडणवीस यांच्यासारखा : राधाकृष्ण विखे पाटील
पुणे : देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा पेशव्यांच्या नाना फडणवीस यांच्या सारखा आहे. पुढे येऊन काही बोलत नाहीत पण मागून पाठबळ देण्याचं काम ते करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. त्यावेळी ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, भाजपने लोकशाहीवर हल्ला सुरु केला आहे.
लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. विचारवंतांना, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात आहे. पोलीस भाजपचे प्रवक्ता असल्यासारखे बोलत आहेत. सनातनच्या जयंत आठवलेंना वेगळ्या न्याय आणि विचारवंतांना वेगळा न्याय लावला जात आहे. भाजप गुंडांना पक्षात प्रवेश देत आहे. सनातनकडून 500 हुन अधिक तरुणांचा बुद्धिभेद करण्यात येत आहे. मोहन भागवतांनी सनातन सोबतचे आर आर एस चे संबंध एकदा स्पष्ट करावेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकार हे घोटाळेबाजांचे सरकार आहे. मोदी सरकार प्रत्येक घटकावर अन्याय करत आहे. राम कदमांच्या व्यक्तव्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. मोदी जर 2019 ला पुन्हा निवडून आले तर लोकशाही , संविधान राहणार नाही. महाराष्ट्राचे लोक 2014 सारखी चूक पुन्हा करणार नाहीत. सरकार चालवणे अवघड झाल्याने पेट्रोल, डिझेल चे दर वाढवण्यात येत आहेत.