देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत, रात्री गेले, पहाटे परतले, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:27 IST2026-02-10T10:27:02+5:302026-02-10T10:27:21+5:30
Devendra Fadnavis News: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून काही तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीचा दौरा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत, रात्री गेले, पहाटे परतले, चर्चांना उधाण
नगर परिषदा, महानगरपालिका निवडणुकांमधील यशानंतर काल लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाने दणदणीय यश मिळवलं आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून काही तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीचा दौरा केल्याने चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या काही तासांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपाला मोठा विजय मिळाल्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीच्या या दौऱ्यामध्ये फडणवीस यांनी भजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन .यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या विलिनीकरणाबाबत भाजपाची भूमिका काय असेल, याबाबतची रणनीती आखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह आणि नितीन नवीन यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगण्यात येत आहे.