Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:17 IST2025-07-21T09:16:45+5:302025-07-21T09:17:37+5:30
Laxman Hake : काल लातूरमध्ये ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचे आता राज्यभरात प्रतिक्रिया उमटत आहेत.

Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
Laxman Hake : लातूरमध्ये ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. यावर आता ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याची मागणी केली.
"शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संविधानिक मार्गाने आंदोलन केलं. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे उत्तर नव्हतं. मग त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना उत्तर काय दिले तर मारहाण केली. या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना आवरा नाहीतर तुमचे जहाड निश्चित समुद्राच्या तळाशी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही',असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
'सुरज चव्हाणांना अटक करा : अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. "सुरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. कृषी मंत्री अधिवेशनात ऑनलाइन पत्ते खेळतात आणि लोकांना राग येऊन त्यांनी निषेध व्यक्त केला तर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत ही गुंड प्रवृत्तीची लोकं मारणार?, असा सवाल दमानिया यांनी केला.
"सूरज चव्हाण ह्या माणसाची इतकी मजाल की, ह्या घटनेनंतर ते एका मराठी चॅनेलशी बोलताना म्हणतात की त्या लोकांनी ‘असंविधानिक’ भाषा वापरली? म्हणून तुम्ही मारहाण करणार? मग मारहाण करणे हे कृत्य संविधानिक आहे ?", असंही दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
"तुम्हाला संविधान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ? तातडीने त्या सूरज चव्हाणांची पदावरून हकालपट्टी करा", अशी मागणी दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहेत. तसेच "मुख्यमंत्री फडणवीस आता तरी थांबवा ही गुंडगिरी', असंही या पोस्टमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे.