devendra fadnavis explains why he took oath as cm in early morning with ajit pawar | घाईघाईत शपथविधी का उरकला?; फडणवीसांनी सांगितलं कारण
घाईघाईत शपथविधी का उरकला?; फडणवीसांनी सांगितलं कारण

मुंबई: पहाटे उठवलेली राष्ट्रपती राजवट आणि सकाळीच उरकलेला शपथविधी यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली. इतक्या घाईघाईत शपथविधी उरकायची गरज काय होती, असा प्रश्न त्यावेळी विरोधकांनी फडणवीसांना विचारला होता. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्यानं घाईघाईत शपथविधी केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. 

शिवसेनेनं आधीपासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याची तयारी केली होती. मात्र तरीही आम्ही महिनाभर शांत होतो. त्यानंतर अजित पवार आमच्याकडे आले. तीन पक्षांचं सरकार चालवणं कठीण असल्याचं राष्ट्रवादीतल्या अनेक आमदारांचं मत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थिर सरकारसाठी पक्षानं भाजपासोबत जावं, असा मतप्रवाह असल्याचं ते म्हणाले. त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रदेखील दिलं. अजित पवारांनी दिलेलं पत्र राष्ट्रपतींकडे गेल्यावरच राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली, अशा शब्दांत फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्यानंतर मी आणि अजित पवारांनी तात्काळ शपथ घेतली. कारण राष्ट्रपती राजवट हटल्यावर राज्यपालांचे अधिकार संपतात आणि त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री नसतो. राज्यात सरकारच नसल्यानं पोकळी निर्माण होते. त्यामुळेच आम्ही सकाळीच शपथविधी उरकला, असं फडणवीस म्हणाले. हा आमचा गनिमी कावा होता, कारण सर्वांनी आम्हाला बाजूला टाकलं होतं. कदाचित आमचा गनिमी फसला असेल. आम्ही उचलेलं पाऊल कदाचित योग्य असेल किंवा अयोग्य नसेल. यावरही चर्चा होऊ शकते, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले. 
 

Web Title: devendra fadnavis explains why he took oath as cm in early morning with ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.