"मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, जे रोज..."; देवेंद्र फडणवीसांचा सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:21 IST2024-01-17T18:40:25+5:302024-01-17T19:21:31+5:30
कराड येथील कृषी प्रदर्शनाला देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलेल्या योजनांची माहिती दिली.

"मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, जे रोज..."; देवेंद्र फडणवीसांचा सणसणीत टोला
कराड - शहरात भरवलेल्या कृषी प्रदर्शनात ४२ लाखांचा बैल आलेला आहे. इथं इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे. बुटकी गायही आलेली आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. पण आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला.
कराड येथे कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना तुमच्याकडे असेल तर सांगा. ते इतके टीव्हीवर बोलतात. त्यामुळे तुमच्याकडे काही योजना अथवा तंत्रज्ञान याठिकाणी आले असेल त्याचाही उपयोग कसा करता येईल हे आम्हाला तुम्ही शिकवा. हे अतिशय सुंदर प्रदर्शन याठिकाणी भरवले त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकावं असं आवाहन त्यांनी केले.
तसेच आज राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. १ रुपयांत आपण पीकविमा योजना आणली. या वर्षी सातारा जिल्ह्यात २ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा घेतला तर ४५ हजार शेतकऱ्यांनी रब्बी पीकासाठी विमा घेतला आहे. विमा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. ज्या भागात नैसर्गिक आपत्ती आली तिथे पहिल्यांदा विम्याची अग्रीम २५ टक्के रक्कम एक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतायेत आणि त्याचसोबत उर्वरीत पैसेही आपण शेतकऱ्यांना देतोय. नमो शेतकरी सन्मान योजना आणली. त्यातून केंद्र सरकार ६ हजार आणि राज्य सरकार ६ हजार रुपये वर्षाला देतायं. शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. नोंदणीकृत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्याचा निर्णय आपण घेतला आहे अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून दिली.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आज आपण पूर्ण करतोय. कॅनेलने जाणाऱ्या पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी आता पाईपपद्धतीने सगळ्यांना पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. गावागावात पाणी पोहचवण्याचं काम आपलं सरकार करतंय. ज्याप्रकारे आपण काम करतोय ते पाहता सातारा जिल्ह्यात दुष्काळ पट्टा कायमचा नाहीसा होणार आहे. शेतकऱ्यांना सौर उर्जेवर कृषी पंपासाठी वीज देणार आहोत. त्यामुळे वर्षाला ३६५ दिवस २४ तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही शेतकऱ्यांसाठी हाती घेतला आहे असंही फडणवीसांनी सांगितले आहे.