“राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणींसाठीच खर्च होणार”: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:27 IST2025-11-28T15:24:02+5:302025-11-28T15:27:46+5:30
Deputy CM Eknath Shinde: राज्याची तिजोरी ही शेतकरी कष्टकरी आणि लाडक्या बहिणींची आहे हा पैसा जनतेचाच आहे आणि जनतेसाठीच खर्च करायला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणींसाठीच खर्च होणार”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची कला मला आहे. त्यामुळेच जनतेच्या मनातले सरकार स्थापन करता आले. त्यामुळे पाचोरा येथील जनता ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहून पाचोरा नगर परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
राज्याची तिजोरी ही शेतकरी कष्टकरी आणि लाडक्या बहिणींची आहे हा पैसा जनतेचाच आहे आणि जनतेसाठीच खर्च करायला पाहिजे. म्हणूनच निधीची कमतरता कधीच पडू देणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विविध जाती-धर्मातील लोकांनी एकजूट दाखवत विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास पाचोर्याचा कायापालट होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
चुनावी जुमला नाही, दिलेला शब्द पाळणारे आम्ही आहोत
नगरविकास, उद्योग आणि शेतकरी योजनांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, पाचोर्यात एमआयडीसीसाठी जमीन मंजूर आहे आणि आता उद्योग आणण्याची प्रक्रिया एका महिन्यात सुरू होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असून, येथील युवक बेरोजगार राहणार नाहीत, असा शब्दही त्यांनी दिला. "चुनावी जुमला नाही, दिलेला शब्द पाळणारे सरकार आम्ही आहोत," असेही त्यांचे स्पष्ट वक्तव्य होते. शिंदे यांनी त्यांच्या सरकारमध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची आठवण करून दिली. मुलींसाठी उच्च शिक्षण शंभर टक्के मोफत करण्याचा निर्णय, मुलांच्या दस्तावेजांमध्ये आईचे नाव अनिवार्य करण्याचा निर्णय, 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाद्वारे चार कोटी नागरिकांना थेट लाभ देणे, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेचारशे कोटींची मदत देऊन हजारो रुग्णांचे प्राण वाचवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत राज्यात विकासकामांना वेग आला असून, जनतेसाठी सत्ता आणि सेवा हा आमचा हेतू आहे; सत्ता आमचा हक्क नाही, सेवा हीच आमची ओळख आहे, असेही शिंदे म्हणाले. धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा अभिमान आहे. या चिन्हाला मत म्हणजे विकासाला मत, असे शिंदे यांनी सांगितले.