“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:50 IST2025-11-27T15:48:13+5:302025-11-27T15:50:04+5:30
Deputy CM Eknath Shinde News: ‘माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून खेळते भांडवल देऊन आर्थिक सक्षम करण्याचे काम सुरू राहील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: ज्या वेळी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहतात त्या वेळी शिवसेनेचा विजय निश्चित असतो. वाशिम-मालेगाव नगरपंचायतीसह कारंजा नगरपरिषदेचा नवीन विकासाचा अध्याय आता लिहिला जाणार आहे. विकासाचे राजकारण नव्हे तर विकासाचे समाजकारण करायचे असून आता थेट अॅक्शन मोडवर काम होईल, असे शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठा, रस्ते आणि गटार यांसह मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगताना त्यांनी आधीच ६५ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प दिल्याची आठवण करून दिली. खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, कब्रस्तानासाठी जागा, मुलांसाठी उद्यान आणि मैदानाची उभारणी लवकरच करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिलांसाठी सुरू असलेली ‘माझी लाडकी बहीण’ योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून खेळते भांडवल देऊन आर्थिक सक्षम करण्याचे काम सुरू राहील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
नगर विकास विभागाकडून निधी दिला जाईल
पांढरकवडा ही ग्रीन सिटी म्हणून ओळखतो. येथील पाणी पुरवठा योजनेसाठी ६५ कोटींचा निधी दिला. चांगले रस्ते, पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, उद्याने विकसित करण्यासाठी नगर विकास विभागाकडून निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. कोळसा खाणी आणि वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करुन वणी प्रदूषणमुक्त केले जाईल. तसेच पांढरकवडा येथे एमआयडीसी सुरु करुन बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
दरम्यान, ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे, असे ते म्हणाले. शासन आपल्या दारी, लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना मदत, महिलांना एसटीमध्ये सवलत अशा अनेक योजना राबवल्या. कामाचे श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आपले वचन म्हणून धनुष्यातून सुटलेला बाण आहे, एकदा वचन दिले की ते पूर्ण करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.