“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 16:04 IST2025-10-12T16:02:04+5:302025-10-12T16:04:22+5:30
Deputy CM Eknath Shinde: मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते पार पडले.

“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते पार पडले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबवडे ज्या मंडणगड तालुक्यात आहे, त्याच मंडणगडमध्ये हे न्यायमंदिर आणि बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे, हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. हे मंदिर न्यायाचे आणि घटनेचे मंदिर आहे याची जाणीव हा पुतळा आपल्याला सदैव करून देईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर, कोल्हापूर खंडपीठाचे पहिले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश माधव जामदार, गृह राज्यमंत्री योगेश कदम, रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी, बार कौन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत, संग्राम देसाई आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
याचे खरे श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच जाते
माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या न्यायालयाच्या पुनर्बांधणीला मंजुरी देण्यात आली. मात्र याचे खरे श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच जाते. या न्यायालयाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले होते आणि लोकार्पणही त्यांच्याच हस्ते होत आहे हा दुग्धशर्करायोग आहे. ज्या पद्धतीने समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केला, त्याचप्रमाणे या कोर्टाचे काम करणाऱ्या कामगारांचा सन्मान याच मंचावर झाला. हेच या सोहळ्याचे खरे वेगळेपण आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झाले, महाड, मंडणगड, मीरा भाईंदर, जव्हार तसेच अन्य ठिकाणी न्यायालयांचे काम पूर्ण झाले. आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत न्याय यंत्रणेबाबत कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली तर आम्ही तो तात्काळ घेतो, त्यात कोणतीही काटकसर करत नाही. कोकणाच्या भूमीत सुरू होणाऱ्या या न्याय मंदिरातून स्थानिक नागरिकांना जलद गतीने न्याय मिळेल, त्यासाठी पायपिट करावी लागणार नाही. तसेच हे न्यायालय म्हणजे सामाजिक लोकशाही निर्माण करण्याची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न खरे करून दाखवेल, इथे फक्त सत्याचाच विजय होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.