“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:04 IST2025-01-13T18:02:26+5:302025-01-13T18:04:26+5:30

DCM Eknath Shinde: विधानसभेला लोकांनी त्यांना धडा शिकवला. आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

deputy cm eknath shinde replied sanjay raut statement over mahayuti | “ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे

“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यातच संजय राऊतांनी केलेल्या एका विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. 

शिवसेना आणि भाजपाची युती तुटली, तेव्हा कम्युनिकेशन गॅप झाला होता, अशा आशयाचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, संजय राऊतांना आता या गोष्टीची आठवण झाली का, बैल गेला आणि झोपा केला, असे आहे की काय, ठाकरे गटाच्या हातून सगळे गेले आहे. तेलही गेले आणि तूपही गेले. संजय राऊतांना आता उपरती झाली, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

२०१९ ला या राज्यातील जनतेने तत्कालीन युतीला स्पष्ट कौल दिला होता. परंतु, स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, बाळासाहेबांचे विचार सोडले. आता तेच म्हणायला लागले आहेत की, बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना स्मारकाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देणार नाही. बाळासाहेबांचे स्मारक शासन करत आहे. बाळासाहेब कोणा एकट्या दुकट्याचे नाहीत. बाळासाहेबांनी लोकनेते म्हणून समाजासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे एक धोरण होते. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, हिंदुत्वासाठी धोरण होते. आता त्यांचे आणि हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यांना विधानसभेला लोकांनी धडा शिकवला. आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का, असा प्रतिप्रश्न एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, उद्धव ठाकरे येणार असतील, तर स्वागत करू, अशी विधाने भाजपाकडून सुरू झाल्यासंदर्भात एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित शाह शिर्डीला आले होते. त्यांचे भाषण तुम्ही ऐका. 


 

Web Title: deputy cm eknath shinde replied sanjay raut statement over mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.