“सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:34 IST2025-10-10T11:23:13+5:302025-10-10T11:34:03+5:30
Deputy CM Ajit Pawar Reaction On Anandacha Shidha Yojana: आनंदाचा शिधा ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

“सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत
Deputy CM Ajit Pawar Reaction On Anandacha Shidha Yojana: राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीने प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जमिनीच्या जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अनेक ठिकाणी बिकट परिस्थिती असतानाच दिवाळीच्या तोंडावर ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ मिळण्याची आशा होती. परंतु, या योजनेसाठी निधीच नसल्याने शासकीय पातळीवर काहीच हालचाल झाली नसल्याची माहिती समोर आली होती. ऐन दिवाळीत आता ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नसल्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी केलेले विधान आता चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी 'आनंदाचा शिधा' योजना सुरू केली होती. परंतु, राज्याच्या सध्याच्या आर्थिक चणचणीमुळे ही योजना आता कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे म्हटले जात असून, ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या अजित पवारांना ‘आनंदाचा शिधा’बाबत प्रश्न विचारण्यात आला.
सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही
काही योजना चालू असतात, सगळ्याच कायम चालतात, असे नाही. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल केले जातात. आता आनंदाचा शिधा ठराविक लोकांना मिळायचा. लाडकी बहीण योजनेचे पैसे जास्त लोकांना मिळतात. सगळ्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक आहे. काही योजना आल्यावर त्याचा उद्दिष्ट साध्य होत नसेल तर त्यामध्ये आपण बदल करत असतो. त्यानुसार आम्ही मार्ग काढत असतो. ही गोष्ट काही आजची नाही. देशाला, राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही पद्धत आहे. खूप योजना याआधीही आल्या, काही बंद केल्या, काही योजनांमध्ये बदल केले, काही योजना आणखी लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने मार्ग काढला. त्याचप्रमाणे याही बद्दल आमचा मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा गोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली. यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.