Coronavirus: ...तर ते पाऊलही उचलू; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोठ्या निर्णयाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 16:25 IST2020-03-23T16:22:38+5:302020-03-23T16:25:23+5:30
Coronavirus घराबाहेर न पडण्याचं आवाहन वारंवार करुनही नागरिक रस्त्यावर

Coronavirus: ...तर ते पाऊलही उचलू; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोठ्या निर्णयाचे संकेत
मुंबई: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचं व घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे ‘कोरोना’ची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या ‘निर्बुद्धां’मुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले. परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारंच, असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन आवश्यक सर्व पावले उचलेल, परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय लागू केला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांचं, निर्बंधांचं पालन राज्यातील बहुतांश जनता करत आहे. राज्याचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज संस्थांचे, तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी त्यांची जबाबदारी जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांची मेहनत राज्यशासन वाया जावू देणार नाही. त्यासाठी शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये, तसे केल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करुन कारवाई करु, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.